जाऊ शब्दांच्या गावा – कानामागून आले शिंगट, ते झाले तिखट!

<<< साधना गोरे >>>

क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करणाऱ्याला कर्णधार म्हणतात. खरं तर कर्ण म्हणजे कान. मग संघाचं नेतृत्व करणाऱ्याला ‘कर्णधार’ का म्हटलं गेलं असेल? यालाच जोडून दुसरा प्रश्न म्हणजे ‘कान पिळणं’, ‘कान धरणं’ या वाक्प्रयोगांमध्ये कानच का? मान्य आहे की, कान हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे; पण हात, पाय हे अवयवसुद्धा धरले किंवा पिळले जाऊ शकतातच, पण या वाक्प्रयोगांत कानाचाच वापर का केला असेल?

संस्कृतमधील ‘कर्ण’पासून मराठी आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये ‘कान’ शब्द वापरला जाऊ लागला. कान हा अवयव आपल्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असतो तसे हातसुद्धा शरीराच्या बाहेरच्या बाजूलाच असतात, पण हातांवर आपलं नियंत्रण असतं तसं कानांवर नसतं. त्यामुळे कुणीही सहजतेने आपले कान धरू शकतं. कपाला किंवा कढईलासुद्धा कान असतात. त्यांचा आकार मानवी कानांसारखाच असतो. दुसरं म्हणजे कप किंवा कढई धरताना या कानाचाच उपयोग केला जातो. अनेक भागांत करंजीला ‘कानवला’ किंवा ‘कानुला’ म्हणतात. या करंजीचा आकार कानाप्रमाणे वाकडा असतो. म्हणून हे नाव पडलं असावं. या करंजी पदार्थाचा आकार आणि करंज झाडांच्या बियांच्या आकारातही साम्य आहे.

संस्कृतमधील ‘कर्ण’ शब्दाचे आणखीही अर्थ आहेत. काटकोन त्रिकोणाच्या काटकोनासमोरची बाजू म्हणजे कर्ण. जहाजातील सुकाणूलाही कर्ण म्हणतात. सुकाणू म्हणजे जहाज विशिष्ट दिशेस वळविण्याचे एक साधन. हे सुकाणू म्हणजेच कर्ण नियंत्रित करणाऱ्याला कर्णधार म्हणतात. तो एक प्रकारे जहाजाचा मार्गदर्शकच असतो. पुढे खेळांमध्ये संघाचं नेतृत्व करणाऱ्या, संघाला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला कर्णधार म्हटलं गेलं. कानातल्या अलंकारांना ‘कर्णभूषण’ किंवा ‘कर्णमात्रा’ म्हणतात. लहान मुलाचे कान टोचण्याच्या समारंभाला संस्कृतमध्ये ‘कर्णवेध’ म्हटलं गेलं आहे. ध्वनिक्षेपकाला मराठीत ‘कर्णा’ म्हणतात, तर एकाकडून दुसऱ्याकडे अशी उडत उडत एखादी गोष्ट पसरत जाण्याला ‘कर्णोपकर्णी’ म्हटलं जातं.

कान उपटणं-धरणं-पिळणं-पिरगळणं-कापणं हे पूर्वी शिक्षेचे प्रकार होते. कालांतराने एखाद्याकडून चूक झाल्यावर त्याला शाब्दिक समज देण्यासंदर्भात हे शब्दप्रयोग वापरले जाऊ लागले. त्याला ‘कानउघाडणी करणं’, ‘कान टोचणं’ किंवा ‘कानपिचक्या देणं’ असंही म्हटलं जातं, तर योग्य मनुष्याकडून, तिऱ्हाईताकडून खरडपट्टी काढली की, सोनाराने कान टोचले म्हणतात आणि स्वतःला अद्दल घडल्यावर, स्वतःला शिक्षा झाली असे मानून तो अनुभव मनात ठसवून त्यापासून बोध घेण्याला ‘कानाला खडा लावणं’ म्हणतात.

‘कान किटणं’, ‘कानावर हात ठेवणं’ किंवा ‘कान झाडून मोकळं होणं’, ‘कान टवकारणं’ किंवा ‘कान देणं’, ‘कान फुंकणं’, ‘कान भरणं’, ‘कानाशी लागणं’, ‘या कानाची खबर त्या कानी होऊ न देणं’ असे कित्येक शब्दप्रयोग आपण सर्रास वापरतो. एखाद्या गोष्टीबद्दल उत्कंठा असताना तिच्याबद्दल चांगली बातमी ऐकून आनंद होतो तेव्हा ‘कान निवले’ किंवा ‘कान थंड झाले’ म्हणतात.

‘भिंतीलाही कान असतात’ ही म्हण आपण नेहमी वापरतो. त्याच अर्थाची ‘कुडास कान, ठेवी ध्यान’ अशीही म्हण आहे. ‘कान द्यावा, पण कानु न द्यावा’ अशी एक म्हण आहे. म्हणजे कुणी आपला कान उपटला तर उपटू द्यावा, पण आपला कोणताही हक्क गमावू नये. ‘कान फूक म्हळ्यार वायन फुकता’ अशी एक कोकणी म्हण आहे. म्हणजे सांगितलेली गोष्ट न करता भलतीच गोष्ट करणं. याच अर्थाची ‘कानाला ठणका व नाकाला औषध’ अशी म्हण आहे.

‘कानामागून आली नि तिखट झाली’ ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, पण ‘कानामागून म्हणजे कुठून?’ असा प्रश्न कधी पडला का? तर त्यासाठी याच्याशी मिळतीजुळती म्हण समजून घेऊ. ‘कानामागून आले शिंगट, ते झाले तिखट’ अशी ती म्हण आहे. म्हणजे शिंगं ही मागाहून फुटतात, तर कान हे उपजत असतात, पण मागाहून येणारी शिंगं कानापेक्षा तीक्ष्ण, टोकदार असून टोचतात. यावरून मागाहून येणाऱ्या, पण वरचढपणाने वागणाऱ्या व्यक्तीला उद्देशून ही म्हण वापरली जाते. ‘कानाला कोपर जडेना’, ‘सासू मेली, जावई रडेना’ अशी एक म्हण आहे. कोपर कधी कानाला लागत नाही, त्याप्रमाणे दूरचा संबंध जोडू म्हणून जोडला जात नाही. रक्ताचा संबंध नाही तिथे आपलेपणा सहसा निर्माण होत नाही.

[email protected]