धावीर महाराज की जयऽऽच्या गजराने रोहा नगरी दुमदुमणार; पोलीस दल देणार सशस्त्र मानवंदना

धावीर महाराज की जयऽऽच्या गजराने रोहा नगरी शुक्रवारी दुमदुमून जाणार आहे. प्रचंड उत्साह व भक्तिमय वातावरणात हा सोहळा होईल. पालखीच्या स्वागतासाठी रोहेकर सज्ज झाले आहेत. चौकाचौकात पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या असून ठिकठिकाणी भगवे झेंडे डौलाने फडकत आहेत. परंपरेनुसार पोलिसांनी सशस्त्र मानवंदना दिल्यानंतर वाजतगाजत पालखी सोहळ्याचा शुभारंभहोणार असून हा सोहळा 28 तास चालेल.

सशस्त्र मानवंदना दिल्यानंतर धावीर महाराज चांदीच्या पालखीत विराजमान होतील. संबळ वाद्य, खालुबाजे, झांज पथके, ताशे, नगारे यांच्या सुरेल आवाजात हजारो भक्तांच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला सुरुवात होणार आहे. २८ तासांनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी पालखी देवस्थानच्या प्रांगणात परतणार आहे. महसूल विभाग, नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी पालखी मार्ग व भक्तांच्या सोयीसाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. धावीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशमुख आणि नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर यांनी भाविकांना पालखी सोहळा शिस्तीने, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

ब्रिटिश काळापासून परंपरा
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला रोह्यातील धावीर महाराजांचा नवरात्रोत्सव १८६२ पासून साजरा केला जातो. पोलिसांनी दिलेली शासकीय मानवंदना ब्रिटिश काळापासून चालत आलेली आहे. तशी लेखी सनद ग्रेट ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांनी १८६४ साली दिलेली आहे. पालखी सोहळ्यासाठी होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सशस्त्र सलामी विनासायास पाहता यावी म्हणून उंच गॅलरी उभारण्यात आली आहे. रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली २१ गार्ड व पोलिसांचे बँड पथक सशस्त्र मानवंदना देईल.