पाकिस्तानने नकाशावर राहायचे की नाही हे ठरवावे, आम्ही ऑपरेशन २.० मध्ये संयम बाळगणार नाही; लष्करप्रमुखांचा इशारा

देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानने ठरवावे की त्यांना जागतिक नकाशावर राहायचे आहे की नाही. जर त्यांनी पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या, तर ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये हिंदुस्थान कोणताही संयम बाळगणार नाही.” राजस्थानमधील अनुपगडमध्ये विजयादशमीनिमित्त सैनिकांना संबोधित करताना लष्करप्रमुख असे म्हणाले आहेत.

लष्करप्रमुखांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. आम्ही यापूर्वी ऑपरेशन सिंदूर १.० मध्ये कारवाई केली होती. आता गरज पडली तर ऑपरेशन २.० राबवण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.”

लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले की, हिंदुस्थानी लष्कर शांतता आणि स्थैर्यासाठी कटिबद्ध आहे, पण सीमेवर कोणत्याही प्रकारची आगळीक खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी पाकिस्तानला शांततेच्या मार्गाने चालण्याचे आवाहन केले, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.