
>> प्रकाश खाडे
कडेपठारच्या डोंगरातील मध्यरात्रीची वेळ… हवेतील गारवा… आकाशाकडे झेपावणाऱ्या हवाई तोफा… फटाक्यांचा आवाज… श्री खंडोबा देवांचा पाल खी भेटीचा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी आलेले हजारो भाविक… मोठ्या उत्साहाने ‘सदानंदाचा येळकोट…’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ असा होणारा जयघोष… अशा भारलेल्या वातावरणात रात्री अडीच वाजता दरीमध्ये असलेल्या रमण्यातील खंडोबाची पालखी व कडेपठारच्या डोंगरावर असलेली पालखी यांची भेट झाली.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला मर्दानी दसऱ्याचा सोहळा प्राचीन खंडा उचलणे स्पर्धा झाल्यावर तब्बल १९ तासांनी संपला. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता खंडोबा गडावर मुख्य पेशवे इनामदार यांनी सूचना केल्यानंतर घडशी समाजातील कलावंतांनी पारंपरिक वाद्ये वाजवून शेडा दिला. पालखीत खंडोबा-म्हाळसा देवी यांच्या मूर्ती ठेवून पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली. श्री मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अभिजित देवकाते, अॅड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, अॅ ड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे, डॉ. राजेंद्र खेडेकर, तहसीलदार विक्रम रजपूत, व्यवस्थापक आशीष बाठे यांच्यासह हजारो ग्रामस्थ गडावर उपस्थित होते.
सर्वांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा घोष करीत पालखीवर भंडारा-खोबरे व सोन्याची (आपटा पाने) मुक्त उधळण केली. यानंतर पालखी गडाला वळसा मारून दरीमध्ये असलेल्या रमणा या ठिकाणी मध्यरात्री एक वाजता नेऊन ठेवण्यात आली.
मानकरी सुभाष राऊत यांच्या परिवाराने तयार केलेले हवाई नळे, दिवट्या पेटवून उजेड केला जात होता. वाटेत आपट्याच्या झाडाचे पूजन केल्यावर गडाच्या पायथ्याशी सकाळी साडेसहा वाजता पालखी आली. रात्रभर सारी जेजुरीनगरी जागीच होती. सकाळी साडेसात वाजता पालखीने पुन्हा खंडोबा गडामध्ये प्रवेश केला. यावेळी घडशी व कोल्हाटी समाजांतील कलावंतांनी देवापुढे वाद्ये वाजवीत गायन व नृत्य करून हजेरी लावली. खंडोबा मंदिराला वळसा मारून पालखी नाचवीत भंडार घरामध्ये नेण्यात आली. तेथे रोजमोरा (ज्वारी धान्य) वाटप करण्यात आले.
खंडा उचलणे स्पर्धेत रमेश शेरे प्रथम
खंडोबा गडामध्ये पेशवाईच्या काळातील सोनोरीचे सरदार पानसे यांनी देवाला अर्पण केलेला एक मण वजनाचा शुद्ध पोलादी ‘खंडा’ (तलवार) आहे. हा खंडा एका हातात उचलून धरण्याची व विविध कसरती करण्याची स्पर्धा या ठिकाणी पूर्वीपासून घेतली जाते. सकाळी आठ वाजता या खंड्याची पूजा पुजारी विलास बारभाई व सरदार पानसे यांचे वंशज यांनी केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. यामध्ये ४० कसरतपटूंनी सहभाग घेतला.
सासवडमध्ये दसऱ्याचा उत्साह
सासवड : ढोल-ताशांच्या गजरात, हलगी-तुतारीच्या निनादात, ‘नाथसाहेबांचं चांगभलं’ व ‘हर हर महादेव’च्या जयघोषात लंगर तोडण्याच्या कार्यक्रमाने सासवडच्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरातील गेली ११ दिवस सुरू असलेल्या शाही दसऱ्याची सांगता झाली. दरम्यान, दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर उत्सवमूर्तीची पालखी ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडून भल्या पहाटे मंदिरात परतली.
गावचे पाटील संग्राम जगताप यांनी
सुशोभित केलेल्या पालखीत उत्सवमूर्तीना ठेवत सीमोल्लंघनासाठी प्रस्थान ठेवले. पुरातन वटेश्वर मंदिराजवळ शस्त्र व आपटापूजन झाल्यावर सासवडची मानाची कावड, सनई-चौघडा असलेली बैलगाडी, देवाची काठी, निशाण, उत्सवमूर्तीची पालखी मंदिरासमोर आली. तेथे मानकरी बापू गिरीगोसावी यांच्या उपस्थितीत पारंपरिक लंगर तोडण्याच्या कार्यक्रम होऊन मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने दसरा उत्साहात साजरा झाल्याचे पुजारी भैरवकर बंधू, तसेच काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप (कारभारी) यांनी सांगितले.
वाल्हेनगरीत पारंपरिक वाद्यांचा गजर
वाल्हे : वाल्हेनगरीत परंपरेनुसार सीमोल्लंघन करून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दसरा सण उत्साही वातावरणात साजरा केला.
यावेळी प्रथेप्रमाणे पालख्या व सासन काठ्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री भैरवनाथ देवाच्या दर्शनभेटीला आल्यावरच सीमोल्लंघनासाठी रवाना झाल्या. या सोहळ्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्यासह भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के-पाटील घराण्याचे गिरीश पवार, विष्णू पवार, सतीश पवार, सरपंच अतुल गायकवाड, संदेश पवार, सुनील पवार, महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक ह.भ.प. अशोक महाराज पवार, पांडुरंग भुजबळ, अमोल खवले, सागर भुजबळ, सचिन लंबाते, राहुल यादव, नाना दाते, अमर आतार आदी उपस्थित होते.
श्री घोडोबाचे दर्शन घेऊन सीमोल्लंघन
शिरूर : हजारो भाविकांनी श्री घोडोबाचे दर्शन घेऊन सीमोल्लंघन केले. देवस्थान परिसर विद्युतरोषणाईने उजळून गेला होता. जुन्या पिढीतील वसंत जोशी महाराज यांनी औक्षण केले. माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे पुत्र राहुल पाचर्णे, नितीन पाचर्णे, सरपंच जगदीश पाचर्णे यांनी प्रसाद देऊन सर्वांचे स्वागत केले.