
देवी विसर्जन मिरवणुकीचा गैरफायदा घेत ड्रग्ज माफिया गांजाची तस्करी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता. पण ट्रॉम्बे पोलिसांनी त्याची तस्करी अचुक हेरून तब्बल आठ किलो 176 ग्रॅम गांजासह वॅगनार कार, मोबाईल, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर देवी विसर्जनानिमित्त ट्रॉम्बे पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. त्यावेळी पोलिसांना पाहून एक वाहन चालक त्याच्या ताब्यातील बॅग लपविण्याचा आटापिटा करू लागला. हा प्रकार दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात आठ किलो 176 ग्रॅम वजनाचा व एक लाख 60 हजार किमतीचा गांजाचा साठा जप्त केला. या गांजाची तस्करी करणाऱया राहुल शिंदे (23) याला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याने हा गांजा कुठून आणला व तो कोणाला विकणार होता याची सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशिल लोंढे अधिक चौकशी करीत आहेत.