
सोलापूर जिह्यातील जवळपास 88 गावांना महापुराचा फटका बसला असून, उभी पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी जमिनीची माती खरवडून वाहून गेली आहे. या सर्व शेतीचे पंचनामे सध्या सुरू असून, आठ ते नऊ ऑक्टोबरपर्यंत हे पंचनामे पूर्ण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
माढा तालुक्यातील केवड येथील पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी ट्रक्टरमधून शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱयांशी संपर्क साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले उपस्थित होते.
सोलापूर जिह्यात जवळपास साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके संपून गेली असून, आता पंचनामे झाल्यावर नेमका आकडा समोर येईल, असे त्यांनी सांगितले. केवड गावात 20-20 फूट जमिनीला खड्डे पडले असून, अशा ठिकाणी या शेतकऱयांचे पुनर्वसन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या पूरग्रस्त गावांतील बाधित नागरिकांना धान्य, दहा हजार रुपयांची रोख मदत आणि पशुपालकांसाठी चारा व मुरघास याचे वाटप सुरू झाल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
पूरग्रस्त भागातील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना त्यांच्या वेदना सांगितल्या. आमचं पुनर्वसन करावं, अशी मागणीदेखील शेतकऱयांनी केली आहे. आमच्या जमिनी पूर्णतः खरवडून गेल्या आहेत. 15 ते 20 फुटांचे खड्डे जमिनीला पडले आहेत. त्यामुळे यातून काही उत्पादन येण्याची अपेक्षाच नसल्याची माहिती शेतकऱयांनी दिली. सरकारने आम्हाला तोकडी मदत न करता भरीव मदत करावी. या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणीही शेतकऱयांनी केली आहे.