
दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना DJ जनरेटरचा अचानक स्फोट झाल्याने सात जण होरपळले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येणाऱ्या विसलोन गावामध्ये ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना अचानक वरुण राजाने हजेरी लावल्याने मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला आणि मुलांनी डीजेचे साहित्य असलेल्या वाहनात आसरा घेतला. यावेळी अचानक जनरेटरचा स्फोट झाला. यात चार महिलांसह दोन लहान मुलं आणि एक तरुण भाजला गेला. यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे.
ताराबाई गोंडे (व. – 79), गुणाबाई कुरेकर (वय – 56), सुंदराबाई डाखरे (वय – 63), अंकुश मेश्राम (वय – 32), शोभा यशवंत बोबडे (वय – 63), यश बोबडे (वय – 4) आणि कुमारी डांगे (वय – 4) अशी जखमींची नावे आहेत. तारा गोंडे व शोभा बोबडे यांची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर वरोरा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित पांडे करीत आहेत.





























































