लोकसंस्कृती – जनसंवादी लोककला

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

संत साहित्यातील संतांचा विचार, उपदेश व आवेश भजनांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. समाज जीवनातील जनप्रबोधनाचे, लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून भजन या मौखिक सादरीकरणाचा अभ्यास करताना गवसलेल्या पैलूंचा वेध घेणारे हे सदर.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि भाषेचे मोठे वैभव सर्व संतांनी निर्मिलेल्या साहित्यातून आकाराला आले आहे. संत साहित्यातील संतांचा विचार, उपदेश व आवेश भजनांच्या माध्यमांतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत शिरोमणी नामदेव, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आदींसह अठरापगड जातीजमातीच्या सकल संतांनी आणि विविध संप्रदायातील महानुभावांनी कोणत्याही चमत्काराशिवाय केवळ आपल्या मौखिक वाड्मयाने पारतंत्र्याच्या, अज्ञानाच्या, अंधकाराच्या काळोखात झोपलेल्या समाजपुरुषाला हलवून जागे केले आहे. त्यामुळे समाज जीवनातील लोकजागृतीचे, जनप्रबोधनाचे तसेच लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून भजनी मंडळांचे कार्य मौलिक आहे. संत हे सामान्य जनातून उदयास आले.

खऱ्या अर्थाने ते जनांचे प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी होते. त्याचमुळे त्यांनी आपल्या दृष्टीतून चालवलेल्या लोकप्रबोधनासाठी सर्वस्वी (जनसंवाद माध्यम म्हणून) भजनांचा वापर प्रकर्षाने केल्याचे दिसून येते.

संतांनी आपला प्रबोधनाचा विचार प्रवाह ज्या भजनी संप्रदायांतून प्रवाहीत केला, त्याचे महत्त्व म्हणूनच फार अनन्यसाधारण असे आहे. भजन म्हणजे मोठ्या समूहाला दिलेला नवाविचारच. संतांचे प्रबोधनाचे कार्य निश्चितच ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण आहे. तत्कालीन परिस्थितीत जे चालले आहे, ते योग्य नाही हे ओळखून प्रस्थापितांना संतांनी विरोध केला. तथापि प्रस्थापित चालीरितींना, रूढी-परंपरांना विरोध करून संतांनी नवा विचार देण्याचा प्रयत्न केला. आपापल्या काळात सर्वच संतांनी समाजशिक्षकाची भूमिका स्वीकारली होती. आपला नवा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सकल संतांनी अभंग रचनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. जनसंवादाचे माध्यम म्हणून भजनी संप्रदायातून याचे सादरीकरण करून नवा विचार मोठ्या समूहापर्यंत पोहोचविला. समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी साध्या भाषेत टाळ, मृदुंग, वीणेच्या नादमधुर साथीने सादरीकरण केलेल्या भजनांना प्रचंड लोकाश्रय मिळाला.

साधेसोपे समाजाभिमुख रसाळ वाड्मय म्हणून संत साहित्य अक्षरत्वाला पोहोचले आहे. खेड्यापाड्यापर्यंत अशिक्षित-सुशिक्षित, नागरी-अनागरी या सर्वांच्या जिभेवर ते खेळते आहे. याच समृद्ध आणि सर्वव्यापी संत वाङ्मयातून ‘भजन’ या लोककला प्रकाराची निर्मिती झाली आहे. भजनी मंडळांच्या माध्यमांतून जनसंवाद प्रक्रिया समजावून घेताना ‘भजन’ या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भजन हे मूलतः नामसंकीर्तन स्वरूपच आहे, असे समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितले आहे. ते म्हणतात –

असो हे सकळ सांडून। करावे गुणानुवाद कीर्तन । या नाव भगवद् भजन। दुसरी भक्ती ।।

मुळात व्युत्पत्तीच्या दृष्टीने पाहता ‘भक्ती’ हा शब्द ‘भज’ या धातूपासून निर्माण झाला आहे. ‘भजन’ हा शब्द तर सरळ सरळ ‘भज्’चेच रूप आहे. संस्कृतमध्ये ‘भज’चा अर्थ ‘सेवा करणे, ‘आश्रय घेणे’ असा आहे. आश्रय घेणे म्हणजे वेगळेपणाने न राहणे असा आहे. ‘भजन म्हणजे सेवा’ हा एक अर्थ आणि ‘एकरूपता’ (वेगळेपणाने नसणे) हा दुसरा अर्थ. ‘भक्ती’ चाही अर्थ हाच.

भजन माध्यमात वेगळेपणाने न राहता एकरूपता अनुभवता येते. अर्थात भजनासारख्या जनसंवाद माध्यमातून संदेशवहन होताना श्रोत्यांना एकरूपता निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होते, हेही खरेच. त्यामुळे ‘भजन’ या जनसंवाद माध्यमांचा थेट सकारात्मक परिणाम होत असल्याचे अनुभवास आल्याशिवाय राहत नाही. गेल्या चारशेहून अधिक काळ भजन या लोककलेची परंपरा आजही तितकीच सर्व थरांतील समाजमनात महत्त्वाची आणि चिरकाल टिकून राहिली आहे.

[email protected]

(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक असून भजन या विषयावर पीएच. डी. केली आहे.)