
नेपाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे गेल्या 36 तासांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे रस्ते, महामार्ग बंद झाले असून पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच मुसळधार पावसाचा विमान सेवेवरही परिणाम झाला आहे.
हिंदुस्थानी सीमेजवळील इलाम जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्थलनामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर दक्षिण नेपाळमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पूर्व नेपाळमधील उदयपूर जिल्ह्यातही एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असेही अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामध्ये 11 जण वाहून गेले असून अद्याप त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. भूस्खलनामुळे अनेक महामार्ग बंद झाले आहेत. काही रस्ते वाहून गेले आहेत. यामुळे ठिकठिकाणी शेकडो प्रवासी अडकले आहेत. यात काही पर्यटकांचाही समावेश आहे. पावसामुळे देशांतर्गत उड्डाणे विस्कळीत झाली असली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू असल्याची माहिती विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.
नेपाळमधून बिहारमध्ये वाहणारी कोशी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. कोशी नदीचा प्रवाह सामान्यापेक्षा दुप्पट असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. साधारण कोशी बॅरेजचे 10-12 दरवाजे उघडण्यात येतात, मात्र सद्य स्थितीत 56 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कोशी नदी धोका पातळीवर वाहत असल्याने बिहारमध्येही प्रशासन अलर्ट आहे.