सर्व सनातनी आणि हिंदू आहेत, इंग्रजांनी आपल्यात फूट पाडली – मोहन भागवत

सर्व सनातनी आणि हिंदू आहेत, इंग्रजांनी आपल्यात फूट पाडली, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. टीव्ही९ भारतवर्षने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, मोहन भागवत यानी मध्य प्रदेशातील सतना येथे मेहेर शाह दरबाराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “आज आपण स्वतःला वेगळे म्हणतो, पण आपण कोणत्याही धर्माचे किंवा भाषेचे असलो तरी सत्य हे आहे की, आपण सर्व एक आहोत, आपण हिंदू आहोत. धूर्त इंग्रजांनी आपल्याशी युद्ध केलं आणि आपल्यावर राज्य केलं. त्यांनी आपली आध्यात्मिक जाणीव हिरावून घेतली आणि आपल्याला भौतिक गोष्टी दिल्या. तेव्हापासून आपण एकमेकांना वेगळे मानतो.”

ते म्हणाले की, “आज सर्वांना सकारात्मक आरशात पाहून एकत्र येण्याची गरज आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक परंपरेच्या आरशात पाहतो तेव्हा आपल्याला एकता दिसून येते. आपले गुरुच आपल्याला हा आरसा दाखवतात. आपण आपला अहंकार सोडून स्वतःकडे पाहिले पाहिजे.”

भाषणात सिंधी समाजाचा विशेष उल्लेख करताना मोहन भागवत म्हणाले की, सतनातील अनेक सिंधी लोक पाकिस्तानला गेले नाहीत, जो अविभाजित हिंदुस्थानचा भाग होता. नवीन पिढीने याचा विचार केला पाहिजे. ते आपलं दुसरं घर आहे, जिथे आपलं सामान आणि जागा इतरांनी हिरावून घेतली. परंतु एक दिवस, आपण ते परत घेऊ.