पालकमंत्रिपदाचा वाद ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल!

नाशिक आणि रायगड जिह्यांच्या पालकमंत्रीपदावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये अजूनही धुसफूस कायम असून आज शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर भलतेच उत्तर दिले. अहिल्यानगर दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा झाली. त्या चर्चेत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषय आला होता का? असा सवाल पत्रकारांनी केला असता ‘‘नाही, तो विषय आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल,’’ असे भुसे म्हणाले आणि अधिक न बोलता पुढे निघून गेले.