
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पुन्हा एकदा अखंड हिंदुस्थानचा राग आळवला. ‘हिंदुस्थान हे आमचे घर आहे. आमच्या या घरातील एक खोली काही लोकांनी बळकावली आहे, ती आम्हाला परत मिळवायची आहे,’ असे भागवत म्हणाले.
मध्य प्रदेशातील सतना येथे एका मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला मोठ्या संख्येने सिंधी समाजाचे लोक उपस्थित होते. तो संदर्भ देत भागवत यांनी अखंड हिंदुस्थानवर भाष्य केले. ’सिंधी बांधव पाकिस्तानात गेले नाहीत, ते येथे राहिले याचा आम्हाला आनंद आहे. परिस्थितीमुळे तुम्हाला त्या घरातून या घरात यावे लागले, पण ते घर आणि हे घर वेगळे नाही, असे भागवत म्हणाले. ’अखंड हिंदुस्थानचा विचार पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे. हिंदुस्थान आमचे घर आहे. त्यातल्या एका खोलीत कधी आम्ही टेबल, खुर्ची आणि कपडे ठेवायचो, ती खोली हडपण्यात आली आहे. ती पुन्हा मिळवून आपल्याला तिथे डेरा टाकायचा आहे, असे ते म्हणाले.