लेह हिंसाचाराची चौकशी होईपर्यंत तुरुंगातच राहणार, सोनम वांगचुक यांचे कोठडीतून पत्र

लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराची व निष्पाप आंदोलकांच्या मृत्यूची स्वतंत्र न्यायालयीन यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज केली. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत माझी तुरुंगात राहण्याची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनेतील सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याच्या मागणीसाठी वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान 24 सप्टेंबर रोजी अचानक हिंसाचार उसळला. त्या वेळी सीआरपीएफच्या जवानांनी तरुणांवर केलेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले. हे आंदोलन भडकवल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक केली आहे. ते सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.

पुण्यात निदर्शने

वांगचुक यांच्या सुटकेसाठी आज पुण्यातील संभाजी गार्डनमध्ये निदर्शने करण्यात आली. हातात फलक घेऊन सुमारे 150 लोक एकत्र आले आणि त्यांनी वांगचुक यांच्या अटकेचा निषेध केला. लोकशाही वाचवा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

गीतांजली यांच्या याचिकेवर आज सुनावणी

वांगचुक यांना ‘रासुका’खाली अटक करण्याच्या विरोधात गीतांजली अँगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. वांगचुक यांना झालेली अटक बेकायदा असून त्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी अँगमो यांनी केली आहे.

गांधीवादी मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन

वांगचुक यांनी लडाखच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया लेह अॅपेक्स बॉडी (लॅब) चे कायदेशीर सल्लागार मुस्तफा हाजी यांच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी हिंसाचाराच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. लडाखच्या न्याय्य मागण्यांसाठी लढणाऱया लॅब आणि कारगील डेमोव्रॅटिक अलायन्स (केडीए) ला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. लडाखच्या हितासाठी या संघटना जे काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. लडाखी जनतेने गांधीवादी मार्गाने शांततेने संघर्ष सुरू ठेवावा, असे त्यांनी म्हटले आहे.