
अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘शक्ती’ चक्रीवादळ रविवारी ‘तीव्र’ चक्रीवादळात रूपांतरित झाले. वादळाचा महाराष्ट्राला धोका नसल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. मात्र पुढील दोन दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर जिह्यांसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ‘शक्ती’ वादळ सोमवारी ईशान्येकडे सरकेल आणि मंगळवारपासून त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
परतीच्या पावसाने महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला तडाखा दिल्यानंतर ‘शक्ती’ चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले होते. मागील दोन दिवसांत अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या या चक्रीवादळाने मुंबईसह महाराष्ट्राची चिंता वाढवली होती. तथापि, महाराष्ट्राला जाणवणारा वादळाचा धोका टळल्याचे हवामान खात्याने रविवारी जाहीर केले. गुजरातच्या द्वारका जिह्यापासून 420 किमी अंतरावर समुद्रात चक्रीवादळ सक्रिय आहे. वादळाचे ‘तीव्र’ चक्रीवादळात रूपांतर झाले. त्यामुळे समुद्रात ताशी 100 किमीपेक्षा अधिक वेगाने सोसाटय़ाचे वारे वाहत आहेत. मात्र त्याचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. वातावरणात झालेल्या बदलामुळे कोकण किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रातून वादळ पुढे सरकत आहे. रविवारपर्यंत वादळाने वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य अरबी समुद्रात आगेकूच केली. सोमवारी सकाळपासून ते पूर्व-ईशान्येकडे सरकेल. त्यानंतर मंगळवारपासून चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होईल, असे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
गुजरातला तडाखा बसण्याची भीती
मान्सूननंतर सक्रिय झालेल्या पहिल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचा गुजरातला तडाखा बसण्याची भीती आहे. त्याच अनुषंगाने हवामान खात्याने गुजरातच्या किनारपट्टी भागातील नागरिक आणि मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसांत गुजरातच्या अनेक भागांत सोसाटय़ाचे वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिव, वेरावल आणि द्वारका जिह्यांना ‘हाय अलर्ट’ दिला आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत गुजरात आणि महाराष्ट्रात समुद्रात खवळलेलाच राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याचा अलर्ट
8 ऑक्टोबरपर्यंत कोकण किनारपट्टीलगत असलेल्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. या कालावधीत वाऱयाचा वेग ताशी 45 ते 55 किमी असेल. वादळी वाऱ्यांचा वेग ताशी 65 किमीच्या आसपास असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.