
कार्तिकी शुद्ध एकादशी 2 नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे आठ ते दहा लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येतात. येणाऱ्या वारकरी, भाविकांना मंदिर समितीकडून आषाढी यात्रेप्रमाणेच सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
दरम्यान, यात्रा कालावधीत वारकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सुरळीत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी परंपरेनुसार 26 ऑक्टोबरपासून 24 तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे.
कार्तिकी यात्रापूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची बैठक श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पृथ्वीराज राऊत, डॉ. विलास वाहणे, श्रीनिवास गुजरे, तेजस्विनी आफळे आदी उपस्थित होते.
औसेकर महाराज म्हणाले, 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक ‘श्रीं’ची शासकीय महापूजा होणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सुरळीत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी परंपरेनुसार 26 ऑक्टोबरपासून 24 तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच मंदिर जतन-संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजेंद्र शेळके यांनी बैठकीत कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘श्रीं’ची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. मात्र, मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी, याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविणे, तसेच 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत 24 तास दर्शन उपलब्ध करून देणे यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.