
अॅल्युमिनियमच्या नावाखाली परदेशातून आयात केलेल्या 23 कोटी किमतीच्या ई-कचऱ्याचा साठा जेएनपीए बंदरातून जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी ही कारवाई केली. बेकायदेशीरपणे मागवलेल्या चार कंटेनरमध्ये लॅपटॉप, सीपीयू, प्रोसेसर चिप्स आदी साहित्य होते. या प्रकरणी सूत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षितता धोक्यात येते अशा प्रतिबंधित वस्तूंची भंगार म्हणून विल्हेवाट लावायची असतानाही बेकायदेशीर ई-कचऱ्याची हिंदुस्थानात आयात केली होती. चार कंटेनरमध्ये एकूण 17,760 जुने आणि वापरलेले लॅपटॉप, 11, 340 सीपीयू, 7, 140 प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 23 कोटींच्या घरात असल्याची माहिती डीआरआय विभागाकडून देण्यात आली. या प्रकरणी सूत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने तस्करीचे नियोजन, खरेदी आणि वित्तपुरवठा करण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे सांगितले. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पर्यावरणाला हानिकारक तरीही
सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या आणि प्रतिबंध असतानाही जेएनपीए बंदरात अॅल्युमिनियमच्या बनावट नावाखाली ई-कचरा आयात करण्यात आलेला होता. याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर डीआरआयच्या पथकाने चारही कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली. या तपासणीत अॅल्युमिनियम ट्रीट स्क्रॅप म्हणून बेकायदा ई-कचरा आयात केल्याचे उघड झाले.