‘हा लोकशाही, संविधान आणि देशाचा घोर अवमान’; सर्वोच्च न्यायालयातील घटनेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या शूजफेकीच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र निषेध केला आहे. हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे, तर लोकशाही आणि संविधानाचा घोर अवमान आहे, असे ते म्हणाले.

शरद पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, न्यायव्यवस्था ही लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांवर आधारित वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेवर अशा प्रकारे हल्ला होणे हे देशासाठी धोक्याचे आहे.

‘आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे’, असे पवार म्हणाले. त्यांनी या घटनेचा निषेध करत, कोणत्याही परिस्थितीत देशातील लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

ही घटना आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात घडली, जिथे एका वृद्ध व्यक्तीने सरन्यायाधीशांवर शूज फेकला. सुदैवाने, शूज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही आणि आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे विचलित न होता, सरन्यायाधीशांनी सुनावणी सुरू ठेवली.

ही घटना सरन्यायाधीशांनी एका खटल्यादरम्यान केलेल्या टिप्पणीनंतर घडली, ज्यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती. त्यांनी एका याचिकेवर बोलताना, ‘जा आणि देवालाच काहीतरी करायला सांगा’, असे म्हटले होते. या टिप्पणीचा निषेध म्हणून हा हल्ला झाल्याचे मानले जात आहे.