वीज बील कमी करण्याच्या आश्वासनाला मुख्यमंत्री फडणविसांनीच फासला हरताळ, दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक – अतुल लोंढे

राज्यातील जनतेचे वीज बील पुढील पाच वर्षात कमी कमी केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले होते. पण मुख्यमंत्री यांनी आपल्याच शब्दाला बगल देत वीज बील महाग केले आहे. दिवाळीच्या तोंडावर केलेली ही वीज दरवाढ सर्वसामान्यांवर टाकलेला बोझा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, वीज दर स्वस्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन हा जुमला ठरला असून इंधन समायोजनाच्या नावाखाली भाजपा महायुती सरकारने जनतेला वीज महागाईचा शॉक दिला आहे. या दरवाढीमुळे १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकालाही या दरवाढीचा फटका बसणार आहे. मोदी सरकारने गब्बर सिंग टॅक्स लादून ८ वर्ष लूट केली व दुसरीकडे जीएसटी कमी केल्याचा आव आणत बचत उत्सव साजरा करण्याचा ढोल पिटता आणि जनतेच्या डोक्यावर सणासुदीच्या काळातच महागाईचे ओझेही टाकता हा कसला बचत उत्सव, असा प्रश्नही अतुल लोंढे यांनी विचारला आहे.