
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहायक आणि लिपीक टंकलेखक पदाच्या भरतीसाठी ही परीक्षा होणार असून याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमधील एकूण 938 रिक्त पदे भरली जातील. पूर्व परीक्षा रविवार, 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवात उद्या, मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून होईल.
उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा, तांत्रिक सहायक पदाच्या 4 जागा, कर सहाय्यक 73 जागा आणि लिपिक टंकलेखक पदाच्या 852 जागांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवात उद्या, 7 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता होईल. तर, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबरला रात्री 23.59 वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन शुल्कदेखील 27 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. तर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चलनाद्वारे शुल्क भरणार असल्यास ते 29 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत घेता येईल. त्यानंतर 30 ऑक्टोबरला कार्यालयीन वेळेत स्टेट बँकेच्या शाखेत चलन भरावे लागणार आहे.