दादरमध्ये भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू; चौघे पादचारी गंभीर जखमी

दादर-पश्चिमेकडे वीर कोतवाल उद्यान परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने प्लाझा सिनेमा बस थांब्याजवळील बेस्ट बस आणि टॅक्सीला जोरदार धडक दिली. त्यात बस डाव्या बाजूला ढकलली गेली आणि तिच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे पादचारी गंभीर जखमी झाले.

बेस्टची 169 क्रमांकाची बस वरळी आगारातून प्रतिक्षानगरच्या दिशेने चालली होती. रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही बस प्लाझा सिनेमा बस थांब्यावर थांबत होती. त्याचदरम्यान दादर टीटीहून शिवाजी पार्कच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्या ट्रॅव्हलरची प्लाझा सिनेमा बस थांब्यावर उभ्या असलेल्या 169 क्रमांकाच्या बेस्ट बसच्या पुढील उजव्या बाजूला जोरात धडक बसली. तिथे उभ्या असलेल्या पादचारी व बेस्ट प्रवाशांना बस धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना बस वाहक आणि पोलिसांनी तत्काळ शीव इस्पितळात नेले. तिथे दाखल करण्यापूर्वी 37 वर्षीय शहाबुद्दीन नावाच्या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच राहुल (30), रोहित (33) आणि अक्षय अशोक पाडाळे (25) या तिघा भावांसह विद्या मोटे (28) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताचा शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत. अपघातानंतर ट्रॅव्हलर चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो दारू प्यायला होता आणि त्याच नशेत त्याने भरधाव ड्रायव्हिंग केल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघड झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करून शिवाजी पार्क पोलिसांनी मद्यपी ट्रॅव्हलर चालकाला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपी चालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

बेस्ट बससह तीन गाड्यांचे मोठे नुकसान

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने बेस्ट बसबरोबर एका टॅक्सी आणि एका टुरिस्ट कारला धडक दिली. त्यात तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. बेस्ट बसच्या दर्शनी भागाची काच पूर्णपणे तुटली. तसेच पुढच्या बाजूच्या टायरचा स्फोट झाला. रात्री हा भीषण अपघात घडला, त्यावेळी रस्त्यावर कमी वर्दळ होती. हा अपघात दिवसा घडला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.