अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरण, पोलिसांनी घटना घडली नसल्याची खोटी माहिती न्यायालयात दिली

विधानसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला. यामध्ये गाडीची काच फुटून देशमुख यांच्या डोक्याला मार लागला होता. मात्र, नागपूर ग्रामीण पोलिसांनी अशी घटना घडलीच नसल्याची खोटी माहिती न्यायालयात दिली आहे. तज्ञांचा फॉरेन्सिक अहवालच पत्रकार परिषदेत सादर करत अनिल देशमुख यांनी या घटनेसंदर्भातील वास्तव सर्वासमोर आणले आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान माझ्या गाडीवर हल्ला झाला होता. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि नंतर त्याला माझ्या विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचे काम करण्यात आले. यात पोलिसांनीदेखील तटस्थ भूमिका न घेता, राजकीय दबावाखाली तपास करत हा हल्ला खोटा असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक अहवालातील तथ्यांकडे दुर्लक्ष करत कारला काच बसवणाऱ्या नागपुरातील खासगी कंपनीच्या मॅनेजरचे मत घेऊन पोलिसांनी ‘बी समरी’ अहवाल न्यायालयात सादर केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी आज केला.

सुरुवातीलाच पोलिसांनी रक्ताचे नमुने, माझे कपडे, गाडीमध्ये पडलेले काचेचे तुकडे, दोन्ही दगड यासह इतर साहित्य परीक्षणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले होते. फॉरेन्सिक लॅबने त्याचे विश्लेषण करून अहवाल पोलिसांना दिला होता. असे असूनही, पुन्हा यासाठी मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबकडे पत्रव्यवहार कशासाठी केला. त्यासाठी पोलीस अधीक्षकांवर कोणाचा दबाव होता याचाही तपास होणे गरजेचे आहे असे देशमुख म्हणाले.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

फॉरेन्सिकचा अहवाल पाहता, हा हल्ला खोटा आहे असे कुठेही म्हटले नाही. गाडीवर दगडफेक करणाऱ्या दोन व्यक्तींचा शोध घेणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून, हा हल्ला कसा खोटा होता हेच दाखविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांची एकंदर भूमिका संशयास्पद असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.