
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने जगभरात खळबळ उडाली आहे. टॅरिफचा शस्त्रासारखा वापर करत ट्रम्प अनेक देशांना अमेरिकेच्या सोयीप्रमाणे व्यापार करार करण्यास भाग पाडत आहेत. अमेरिकेच्या टॅरिफवर कॅनडाने टीका करत त्यांना सुनावले होते. मात्र, ट्रम्प यांचा दबाव वाढताच कॅनडाने भूमिका बदलली असून यू टर्न घेतला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित केल्याचे सांगत ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या आणि कॅनडाने केलेल्या टीकेनंतर दोन्ही देशातील तणाव वाढला होता. मात्र, आत कॅनडाच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि मार्क कार्नी वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये भेटले. त्यावेळी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मंगळवारी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आणि त्यांना परिवर्तन घडवणारे राष्ट्रपती म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेदरम्यान कार्नी यांनी जागतिक घडामोडी आणि आर्थिक स्थिरतेबाबत ट्रम्प यांना श्रेय दिले. तुम्ही परिवर्तन घडवणारे अध्यक्ष आहात, अर्थव्यवस्थेतील परिवर्तन, संरक्षण खर्चासाठी नाटो भागीदारांच्या अभूतपूर्व वचनबद्धता, हिंदुस्थान, पाकिस्तान ते अझरबैजान, आर्मेनियापर्यंत शांतता, दहशतवादाच्या शक्ती म्हणून इराणला निष्क्रिय करणे, अशा शब्दांत कार्नी यांनी ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
मार्चमध्ये पदभार स्वीकारलेले कार्नी यांनी यापूर्वी मे महिन्यात वॉशिंग्टनच्या भेटीदरम्यान ट्रम्प यांची भेट घेतली होती. ट्रम्पच्या टॅरिफ धमक्या आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी कॅनडाला “अॅनेक्स” केले पाहिजे, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्य आणि राजनैतिक अस्वस्थतेनंतर मंगळवारी त्यांनी केलेले वक्तव्य कॅनडाच्या भूमिकेत लक्षणीय बदल दर्शवते. ट्रम्प यांच्या दबावनीतीमुळेच कॅनडाने यूटर्न घेतल्याची चर्चा आहे.