अमित शहा कार्यवाहक पंतप्रधानाप्रमाणे वागतायत, मीर जाफरप्रमाणे विश्वासघात करतील, मोदींनी सावधगिरी बाळगावी – ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुलना मीर जाफरशी केली. ममता बॅनर्जी यांनी अमित शहा देशाचे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. पूरग्रस्त उत्तर बंगालमधून परतल्यानंतर कोलकाता विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नये, कारण एक दिवस ते मीर जाफर बनून त्यांचा विश्वासघात करू शकतात.

पत्रकारांशी बोलताना ममता म्हणाल्या, “हे सरकार देशाला उद्ध्वस्त करेल. मी अनेक सरकारे पाहिली आहेत, पण याइतकी अहंकारी आणि हुकूमशाही सरकार मी कधीही पाहिली नाही. त्यांनी हे लक्षात ठेवावे की ते आज सत्तेत असले तरी उद्या कदाचित नसतील. त्यांच्या पक्षाच्या नेत्याने म्हटले आहे की, ते बंगालमधील ८,००,००० मतदारांची नावे वगळतील. बंगालमध्ये पाऊस, पूर सारखी परिस्थिती आहे. तरीही ते १५ दिवसांत एसआयआर करण्याबद्दल बोलत आहेत. भाजप यामध्ये कमिशन देखील घेणार आहे.”

यावेळी ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “हा सगळा अमित शहांचा खेळ आहे. ते कार्यवाहक पंतप्रधानांसारखे वागत आहेत. पण मला दुःख आहे की पंतप्रधानांनाही सर्व काही माहित आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “मी पंतप्रधानांना सांगू इच्छिते की, अमित शहांवर नेहमीच विश्वास ठेवू नका. एक दिवस ते मीर जाफर बनून तुमचा विश्वासघात करू शकतात. आधीच काळजी घ्या.”