पश्चिम द्रुतगती महामार्गावर जीवघेणी शर्यत; दुभाजकाला धडकून Porsche कार पलटी, चालक जखमी, BMW कार चालक पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. बीएमडब्ल्यू कार आणि पोर्शे कारमध्ये शर्यत सुरू असताना नियंत्रण सुटल्याने पोर्शे कार दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. यात पोर्शे कार चालक गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून बीएमडब्ल्यू कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास बोरिवलीहून अंधेरीकडे जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बीएमडब्ल्यू आणि पोर्शे कारमध्ये शर्यत सुरू होती. याचवेळी पोर्शे कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन धडकली. यानंतर पोर्शे कार चार ते पाच वेळा पलटी झाली.

या अपघातामध्ये कारचा (क्र डीएन 09 क्यू 1777) चेंदामेंदा झाला असून 22 वर्षीय चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. चालकाचे नाव Neo Sonks असे असून त्याला स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

जोगेश्वरी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी इक्बाल शिकलगर यांनी या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. यात Neo Sonks जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरी गाडी त्याचा मित्र चालवत होता आणि त्याच्याविरुद्ध भादवि कलम 125 (बी), 281 आणि मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.