नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याचा भाजप-अदानींचा डाव! संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. मात्र दि. बा. पाटील यांच्या नावाला भाजप आणि गौतम अदानी यांनी विरोध केला आहे. जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जावे आणि विमानतळाला त्यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी भाजपकडून होत आहे. याबाबत अदानी आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका, चर्चा झाल्या असून त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मोदी या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करतील अशी अपेक्षा होती; परंतु 20 मिनिटांच्या भाषणात त्यांनी दि. बा. पाटील यांचा ओझरता उल्लेख केला, पण त्यांच्या नावाची कोणतीही घोषणा केली नाही. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील फार महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात अत्यंत महत्त्वाचे विमानतळ म्हणून जगात यापुढे नावलौकिकास येणार आहे. या विमानतळावा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून केंद्राला पाठवला. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल असे वाटले होते. कालच ते द्यायला हवे होते, पण पंतप्रधानांनी काल विमानतळाचे उघड्या-बोडक्या विमानतळाचे उद्घाटन केले. माझी माहिती अशी आहे की, दि. बा. पाटील यांच्या नावाला भाजपने विरोध केला आहे. गौतम अदानी यांचाही दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध आहे. नवी मुंबई विमानतळाला ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्यावे अशी भाजपांतर्गत चर्चा, सूचना आणि मागणी सुरू झाली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, अशी मागणी होत आहे. याआधी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने अहमदाबाद येथे होते. त्यानंतर नामांतर मोदींच्या जिवंतपणे झाले. त्याचप्रमाणे सगळ्यात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मोदींचे नाव द्यावे. याबाबत दिल्लीत एकमत झालेले आहे आणि अदानी यांचीही हीच मागणी आहे. म्हणून काल दि. बा. पाटील यांच्या नावाने विमानतळाचे लोकार्पण होऊ शकले नाही, असा दावा राऊत यांनी केला.

विमानतळाचे लोकार्पण झाले, पण दि. बा. पाटील यांचे नाव न देता. मोटेरा स्टेडियम प्रमाणे हे विमानतळ नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जावे अशी भाजप आणि अदानींची मागणी आहे. याबाबत अदानी आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका, चर्चा झाल्या असून त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत आहे, असेही राऊत म्हणाले. मात्र आमची स्पष्ट भूमिका आहे की भूमिपुत्र दि. बा. पाटील यांच्या नावानेच हे विमानतळ ओळखले जावे. नरेंद्र मोदी अजरामर आहेत, ते विष्णूचा तेरावा अवतार आहे. विमानतळाला त्यांचे नाव देण्याची गरज नाही, असेही राऊत स्पष्ट म्हणाले.