
ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नाहून नवी दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे दुबईला वळवण्यात आले. विमान दुबईत सुरक्षितपणे उतरवण्यात आले. दुबई विमानतळावर आवश्यक तपासणी केल्यानंतर विमान उशिराने रवाना करण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने घटनेला दुजोरा दिला.
एअर इंडियाचे AI154 हे विमान नियोजित वेळेनुसार व्हिएन्नाहून नवी दिल्लीसाठी रवाना झाले. मात्र विमानात काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने ते दुबईला वळवण्यात आले. दुबई विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवून आवश्यक तपासणी करण्यात आली, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
सर्व प्रवाशांना विलंबाची माहिती देण्यात आली. तसेच त्यांना अल्पोपहार देण्यात आला. अनपेक्षित विलंबामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. एअर इंडियामध्ये, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले.