Latur News – पूरग्रस्त शेतकऱ्यांना थेट अमेरिकेतून मदत, 116 शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 रुपये टाकले

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी या गावातील अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी माणुसकीचे दर्शन घडविले. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून गावातील 116 शेतकऱ्यांना प्रत्येकी 3700 रुपये प्रमाणे 4 लाख 29 हजार 200 रुपयांची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

अंकुलगा राणी येथील भूमिपुत्र जगन्नाथ स्वामी हे मागील अनेक वर्षापासून अमेरिकेमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांना लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची माहिती मिळताच स्वामी यांनी आपले वडील शिवरुद्र स्वामी यांच्याशी संपर्क साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. जगन्नाथ स्वामी यांनी अमेरिकेतील आयर्लंड फ्लोरिडासह अन्य भागामध्ये राहणाऱ्या अनिवासीय भारतीयांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली व शेतकऱ्यांना मदत करण्याचा संकल्प बोलून दाखवला. त्यांच्या या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत 30 जणांनी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.

या संकल्पनेतून एकूण 4 लाख 29 हजार 200 रुपये मदत जमा झाली. ही मदत त्यांनी सोमवारी वडील शिवरुद्र स्वामी यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली. दिवाळीपूर्वी मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर राणी अंकुलगा येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

यासंदर्भात जगन्नाथ स्वामी यांचे वडील शिवरुद्र स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता माझ्या मुलाच्या मित्रमंडळाच्या वतीने छोटीशी मदत करून शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्या मुलाने केला याचे मला समाधान असल्याचे त्यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले.

अंकुलगा गावातील अमेरिकेत राहणाऱ्या तरुणांनी शेतकऱ्यांपती माणुसकीचे दर्शन घडवून माणुसकी जपली आहे. प्रत्येक गावातील शासकीय नोकरदार उद्योग करणाऱ्या तरुणांनी व्यक्तीने शेतकऱ्याच्या मदतीला धावून यावे व राणी अंकुलगा येथील सुपुत्रांचा आदर्श घ्यावा अशी भावना शेतकरी वर्गातून केली जात आहे.