Ratnagiri News – सहा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित, पॉल मशीनचा वापर न केल्याने कारवाई

रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे न केल्यामुळे तसेच खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे विक्री परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तर 5 विक्रेत्यांना भविष्यात नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. ही कारवाई परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी केली.

खत विक्रेत्यांना रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक आहे. असे असतानाही, तपासणीमध्ये काही विक्रेते या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले. खत नियंत्रण आदेशाचे हे स्पष्ट उल्लंघन असल्याने कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व खत विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावरही अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सदाफुले यांनी दिला आहे.