
>> डॉ. समिरा गुजर–जोशी
उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमये तथा। सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता।।
सूर्य उगवताना तसेच मावळताना लाल रंगाचा असतो, थोर माणसे समृद्धीच्या तसेच विपत्तीच्या प्रसंगी सारखीच असतात. उत्कर्ष होत असताना, प्रगतीच्या नाना संधी खुणावत असताना कोणीही व्यक्ती निश्चितच आनंदी, उत्साही असते. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संकट येतं, ती अडचणीत सापडते; अशा वेळी तिचा स्वभाव तसाच राहात नाही. अशा वेळी माणसे वैफल्यग्रस्त होतात, कटू होतात.
सुखाच्या वेळी असणारी आपली मनःस्थिती दुःखाच्या वेळी कायम राहात नाही हे वास्तव आपण अनुभवलेले आहे. सर्वसामान्य व्यक्ती आणि लोकोत्तर व्यक्ती यांच्या बाबतीत असणारा हा मोठा बदल ह्या ठिकाणी अधोरेखित केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ते अविचल राहतात. बाह्य परिस्थितीचा त्यांच्या आंतरिक परिस्थितीवर ते परिणाम होऊ देत नाहीत. गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगतानादेखील या गोष्टीवर भर दिला आहे. सूर्य हे तेजस्वी व्यक्तींचे प्रतीक मानण्यात आले आहे. सकाळी उगवणाऱ्या सूर्याचा रक्तिमा आणि संध्याकाळी मावळणाऱ्या सूर्याचा रक्तिमा सारखाच असतो. ह्या नैसर्गिक घटनेतून काय बोध घ्यावा हे ह्या अन्योक्तीतून सुचवले आहे.





























































