मीरा-भाईंदरमधील २५ हजार बाप्पा ‘गावाला’ गेलेच नाहीत; हजारो मूर्ती एक महिन्यापासून मोकळ्या मैदानातच पडून, महापालिकेविरोधात आज महाविकास आघाडीची महाआरती

गणेशोत्सव होऊन एक महिना संपला तरी मीरा-भाईंदरकरांचे बाप्पा अजूनही ‘गावाला’ पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. पालिकेने शहरात ३६ कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये सहा फुटांपर्यंतचे तब्बल २५ हजार गणपतींचे विसर्जन केले. मात्र मूर्तीची संख्या जास्त असल्याने पालिकेने घिसाडघाई करत विसर्जन केलेले बाप्पा लागलीच काढून मोकळ्या मैदानात ठेवल्याचा आरोप करण्यात येत असून हजारो मूर्ती एक महिन्यानंतरही तशाच पडून आहेत. त्यामुळे ही गणपतीची विटंबना असल्याचा आरोप करत महापालिकेविरोधात उद्या शनिवारी महाविकास आघाडी महाआरती करणार आहे.

मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावात दीड दिवसाचे ६ हजार ३८४, तीन दिवसांचे १ हजार १६७, पाच दिवसाचे ४ हजार २९२ व सात दिवसाचे २ हजार ७२४ आणि अनंत चतुर्दशी दिवशी २०१५ श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी पालिकेकडे सोपविल्या होत्या. यात शाडू तसेच पीओपी मूर्तीचा समावेश होता. मात्र कृत्रिम तलावातून या मूर्ती काढून शिवार गार्डन मैदान, बाळासाहेब ठाकरे मैदानाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत व स्व. मीनाताई ठाकरे मंडई येथे नेऊन ठेवल्या आहेत. वास्तविक वेळेत या मूर्तीची विधिवत विल्हेवाट लावणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने पालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात ११ ऑक्टोबर रोजी महाआरती करून निषेध केला जाणार आहे. तसे पत्र सर्वपक्षीयांनी पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांना दिले आहे.

पालिकेची धावाधाव
महाविकास आघाडीने महाआरतीचा इशारा देताच खडबडून जाग आलेल्या पालिकेने पदाधिकाऱ्यांनी चर्चेचे आमंत्रण देत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, उपजिल्हाप्रमुख प्राची पाटील व क्षमा गांधी, विभागप्रमुख जगदीश जोशी, किरण मांजरेकर, युवासेनेचे दीपेश गावंड, श्रेयस हडकर, शहरप्रमुख प्रशांत सावंत व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, सिद्देश राणे, दीपक बागडी, रवी खरात, सुशांत शेट्टी, मनसे जिल्हाप्रमुख संदीप राणे, सचिन पोपळे आदी उपस्थित होते.