‘द्रष्टा’ हेन्री डेव्हिड थोरो

हेन्री डेव्हिड थोरो हा विचारवंत, तत्त्वज्ञानी. ज्याच्या विचारांचे गारुड आजही वाचकांच्या मनावर राज्य गाजवते. त्यांचा ‘वॉल्डन’ हा ग्रंथ सर्वाधिक लोकप्रिय ठरला. ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत यांनी त्यांच्या या पुस्तकाचा केलेला अनुवाद म्हणजे ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ हे पुस्तकही तितकेच लोकप्रिय आहे. आता त्यांची चरित्रकहाणी ‘द्रष्टा’ या पुस्तकातून आपल्यासमोर येत आहे. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांचे हे पुस्तक अभिषेक धनगर यांच्या ‘वॉल्डन’ प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. याबाबत वैशिष्टय़पूर्ण गोष्ट अशी की ‘द्रष्टा’ या पुस्तकासोबत प्रकाशकाने थोरोंच्या काळचा तत्कालीन काँकॉर्डचा (थोरोंच्या गावचा) नकाशा दिला आहे. यात थोरोंचे जन्मघर, वॉल्डन सरोवर, वॉल्डनकाठी थोरोंची कुटी, थोरोंनी शेती केली ती जमीन, थोरो नौकाविहार करत तो नदीचा परिसर, त्यांचा भटकण्याचा मार्ग, पेन्सिल कारखाना, इमर्सन यांचं घर अशी थोरोंच्या जीवनातील अनेक महत्त्वाची स्थळं दाखवली आहेत. अतिशय सुंदर आणि वाचनाचा आनंद द्विगुणित करणारा असा हा नकाशा वाचकांना पुस्तकासोबत मिळणार आहे. हा नकाशा जाणीवपूर्वक पुस्तकात न छापता सुंदर एनव्हलपमध्ये पुस्तकासोबत मिळणार आहे. ज्याचे डिझाईन थोरोंच्या 150व्या जन्मदिनानिमित्त अमेरिकन सरकारने प्रकाशित केलेल्या एनव्हलपवरून घेतले आहे. मराठी प्रकाशनविश्वातील अशा गोष्टी म्हणजे वाचनाच्या निर्लेप अनुभूतीची साक्षच.