Akole News – शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकान जळून खाक

शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील तांभोळ येथील बाळासाहेब नवले यांच्या हॉटेल व किराणा दुकानाला ही आग लागली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बाळासाहेब नवले व त्यांची पत्नी नंदा नवले हे तांभोळ गावातील चौकात किराणा व हॉटेल व्यवसाय करत असतात. दिवाळी असल्याने त्यांनी किराणा दुकानासाठी माल भरला होता.मध्यरात्री अचानक त्यांच्या दुकानाला आग लागली. ते जवळच राहायला असल्यामुळे त्यांच्या घराच्या खिडकीची काच फुटल्याने सदर घटना लक्षात आली. या आगीत त्यांच्या दुकानातील सर्व माल व साहित्य जळून तब्बल दोन लाख रूपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

तांभोळचे उपसरपंच सुदाम नवले,माजी सरपंच मंगेश कराळे, सुरेश दोरगे, प्रतिक नवले, सिद्धार्थ शिंदे, राजू मोहिते, विजय मोहिते आदींनी आग विझविण्यासाठी मदत केली. मंगेश कराळे हे जखमी झाले आहेत. सदर नवले कुटुंबीय यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रशासनाने नवले कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंच माने यांनी केली आहे. नवले दांपत्य यांच्या जळीत घटने बद्दल तांभोळ व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. परंतु प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.