
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी महायुतीमधील एकनाथ शिंदे गटात मात्र कमालीची अस्वस्थता आहे. कारण युती नकोच असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांनी धरल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘एकला चलो रे’चा संदेश दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणेसह अन्य काही महानगरपालिका स्वबळावर लढवूया असे जवळपास सर्वच भाजपा कार्यकर्त्यांचे मत आहे. महायुतीमध्ये विशेषकरून एकनाथ शिंदे गटाशी युती नकोच असा भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्यांच्या त्या भावनांचा आदर ठेवत देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला तत्वतः मान्यता दिल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
ठाण्यामध्ये आपला जोर असल्याच्या भ्रमात शिंदे गट असला तरी मुंबईत मात्र शिंदे गटाचे आणि अगदी अजित पवार गटाचेही अस्तित्व नगण्य असेच आहे. त्या परिस्थितीत या दोन्ही गटांशी युती न करता भाजपने आपल्या ताकदीवरच रिंगणात उतरावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
भाजपाचे नेटवर्क आहे. मुख्यमंत्री भाजपचा आहे. गृहखाते भाजपकडे असल्याने पोलीस व अन्य यंत्रणांवर त्यांची पकड आहे. विधानसभेत भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. भाजपचे हे वर्चस्व स्थानिकच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी पुरेसे असल्याने मित्रपक्षांचा आधार घेण्याची गरजच नाही असे भाजपमधील ज्येष्ठांना वाटते. मात्र सरकारमध्ये असल्याने मित्रपक्षांची नाराजी टाळण्यासाठी मैत्रिपूर्ण लढतीचा पर्यायही भाजपने खुला ठेवल्याचे समजते.
शिंदे गटाबरोबर युती का नको असे या नेत्याला विचारले असता त्याने शिंदे यांच्या विस्तारवादी धोरणामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे सांगितले. मुंबई आणि ठाणे येथील भाजप कार्यकर्त्यांना शिंदे गटाकडून बराच मानसिक त्रास झाल्याचा त्यांचा आरोप आहे. नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतही तशीच परिस्थिती असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे युतीबाबत निर्णय घेण्यात फडणवीसही जरा जपूनच पावले टाकत आहेत आणि आत्तापासूनच नाराजी नको म्हणून स्वबळाचा नाराही त्यांनी जाहिररित्या दिलेला नाही.