
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून रविवारी भाजपप्रणित एनडीएने जागावाटपाची घोषणा केली. भाजप व जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढणार आहे. तर उर्वरित जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या.
चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला 29 जागा देण्यात आल्या आहेत. तर, हिंदुस्थानी अवाम मोर्चा व राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत. यानंतर राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांना परिस्थिती समजावण्याचा प्रयत्न केला.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये उपेंद्र कुशवाह म्हणाले की, ‘मी तुम्ही सर्वांची माफी मागतो. आपल्या मनासारख्या जागा आपल्याला मिळाल्या नाहीत. यामुळे हजारो, लाखो लोक नाराज होतील. यात पक्षाच्या इच्छुक उमेदवारांसह माझ्या सहकाऱ्यांचाही समावेश आहे. आज अनेक घरांमध्ये चूल पेटली नसेल. पण तुम्ही माझ्या आणि पक्षाच्या मर्यादा, अडचणी समजून घ्या.’
‘कोणत्याही निर्णयामागे काही गोष्टी अशा असतात ज्या बाहेरून स्पष्ट दिसतात, पण काही गोष्टी अशाही असतात ज्या समोर येत नाहीत. अंतर्गत परिस्थितीबाबत आपल्याला माहिती नसल्याने तुम्हाला माझा राग येणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही रागावर नियंत्रण मिळवा, शांत व्हा. मग तुम्हाला समजेत की निर्णय योग्य आहे की अयोग्य. काही गोष्टी येणारी वेळच सांगेल, तूर्तास एवढेच‘, असेही कुशवाह यांनी स्पष्ट केले.
प्रिय मित्रों/साथियों,
आप सभी से क्षमा चाहता हूं। आपके मन के अनुकूल सीटों की संख्या नहीं हो पायी। मैं समझ रहा हूं, इस निर्णय से अपनी पार्टी के उम्मीदवार होने की इच्छा रखने वाले साथियों सहित हजारों – लाखों लोगों का मन दुखी होगा। आज कई घरों में खाना नहीं बना होगा। परन्तु आप सभी…
— Upendra Kushwaha (@UpendraKushRLM) October 12, 2025
दरम्यान, दोन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. या निवडणुकीत एनडीएतून उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत. यात उजियारपूर, मधुबनी, सासाराम, दिनारा, महुआ आणि बाजपट्टी या मतदारसंघांचा समावेश आहे.