भाजपने ‘नेहरू’ नावाचा धसका घेतला; मुंबईतील मेट्रो स्थानकाला ‘सायन्स सेंटर’ नाव दिल्यानं काँग्रेसची सडकून टीका

मुंबईतील वरळी भागामध्ये ‘नेहरू सायन्स सेंटर’ आहे. याजवळ उभारण्यात आलेल्या मेट्रो स्थानकाला फक्त ‘सायन्स सेंटर’ नाव दिल्याने राजकारण तापले आहे. काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे. नेहरू या नावाची अ‍ॅलर्जी असल्यामुळे भाजपने मुद्दामहून ते नाव वगळून या मेट्रो स्थानकाचे नाव केवळ सायन्स सेंटर असे ठेवले. भाजपने नेहरू नावाचा धसका घेतला आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सचिन सावंत यांनी केली.

नाव पुसल्याने इतिहास बदलत नाही, असे ट्विट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. ज्यांना स्वतःचं कर्तृत्व दाखवता येत नाही, ते इतरांचं नाव पुसण्यातच समाधान मानतात. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर ही ओळख होती, पण तेथील मेट्रो स्थानकाचं नाव केवळ सायन्स सेंटर असं करण्यात आलं. सूर्य झाकण्याचा प्रयत्न केल्याने रात्र होत नाही हे सत्य अशा कृतींनी पुन्हा अधोरेखित होतं, असेही त्यांनी म्हटले.

पंडित नेहरू यांच्या नावाचा भाजपने घेतलेला धसका आणि दाखवलेला संकुचितपणा त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं द्योतक आहे. नेहरूंचं योगदान कुणीही पुसू शकत नाही. कारण त्यांनी नालीतून गॅस शोधला नाही, तर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून इस्त्रोची स्थापना केली. आजही प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे, आणि तीच त्यांच्या दूरदृष्टीची खरी साक्ष आहे. म्हणून मेट्रो स्थानकाचे नाव नेहरू सायन्स सेंटर करावे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

भाजपला नेहरू नावाची अ‍ॅलर्जी

संपूर्ण देशाला माहीत आहे की वरळी येथील हे स्थान नेहरू सायन्स सेंटर म्हणूनच ओळखले जाते. मुंबई मेट्रो यांच्या ट्विटमध्येही ‘डिस्कव्हरी हब्स’ यादीत या ठिकाणाचे नाव नेहरू सायन्स सेंटर असेच दाखवले आहे. पण नेहरू या नावाची अ‍ॅलर्जी असल्यामुळे भाजपने मुद्दामहून ते नाव वगळून या मेट्रो स्थानकाचे नाव केवळ सायन्स सेंटर असे ठेवले आहे. ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून भारताचे पहिले पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे नेते भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्या स्मृतीचा मोठा अवमान आहे. भारताला आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टी देण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. पुन्हा एकदा भाजपचा संकुचित, सूडबुद्धीचा आणि असहिष्णू दृष्टिकोन या कृतीतून स्पष्ट दिसतो, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.

दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे नाव बदलून प्राईम मिनिस्टर्स म्युझियम करण्यात आले, नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) चे नाव बदलून माय भारत करण्यात आले,आणि अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कर्तृत्व एवढे महान आणि अढळ आहे की भाजपाने त्यांच्या विषयी कितीही दुस्वास दाखवला किंवा चारित्र्यहननाचा प्रयत्न केला, तरी ते प्रयत्न आभाळावर थुंकण्यासारखेच ठरतील. आमची ठाम मागणी आहे की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे नाव पुन्हा या वरळी मेट्रो स्थानकाला देण्यात यावे. भारताच्या महान नेत्यांशी आणि राष्ट्रनिर्मात्यांशी होत असलेली ही वागणूक संपूर्ण जग पाहत आहे. भाजपची ही विकृत मानसिकता केवळ इतिहास पुसण्याचे काम करत नाही तर देशाच्या प्रतिष्ठेला आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही धक्का पोहोचवत आहे. भाजपाच्या या लज्जास्पद कृतीचा तीव्र निषेध, असेही सावंत यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले.