
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनसह जगभरातील देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत असताना त्यांचा देश अत्यंत अडचणीत आहे. अमेरिकेतील संकट बिकट होणार असून वाढत्या कर्जाचा अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे मत अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील वाढत्या कर्जाच्या आकडेवारीचा हवाला देत अनेक विश्लेषक आणि प्रमुख गुंतवणूकदारांनी याबाबत दावा केला आहे. अब्जाधीश गुंतवणूकदार रे डालिओ यांनी आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल आणि ट्रम्प टॅरिफच्या परिणामांबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी अमेरिका संघर्षाशिवाय गृहयुद्धाकडे वाटचाल करत आहे, असा इशाराही दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प कदाचित टॅरिफला महसूल वाढवणारा उपाय म्हणत असतील, परंतु अमेरिकेच्या वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मोठे संकट येऊ शकते. 2008 मध्ये आर्थिक मंदीची पहिली भविष्यवाणी करणारे अब्जाधीश रे डालिओ यांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक अब्जाधीश रे डालिओ यांनी अमेरिकेच्या आर्थिक परिस्थिती आणि ट्रम्प टॅरिफमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर चर्चा केली. त्यांनी अमेरिकेच्या वाढत्या कर्जाबद्दल चिंता व्यक्त केली आणि एक गंभीर इशारा दिला. त्यांनी सांगितले की अमेरिकेचा कर्जाचा बोजा आता इतका वाढला आहे की तो देशाच्या धमन्यांमध्ये साचलेल्या चरबीसारखा दिसतो. त्यांनी इशारा दिला की जर या परिस्थिती सुधारल्या नाहीत तर देशातील वाढती राजकीय आणि आर्थिक अस्थिरता गृहयुद्धाला कारणीभूत ठरू शकते. त्यांनी सांगितले की हे आधुनिक गृहयुद्ध सशस्त्र संघर्षातून होणार नाही, तर वाढत्या कर्ज, आर्थिक असमानता आणि राजकीय अशांततेशी संबंधित असेल.
डालिओ अब्जाधीश असून त्यांनी २००८ मध्ये मंदीचा आणि त्यानंतरच्या परिस्थितीचा पहिल्यांदा अंदाज वर्तवला होता. त्यांनी अमेरिकेतील टॅरिफ, राजकीय मतभेद आणि कर्जाचा बोजा याबाबतची माहिती देत गंभीर इशाराही दिला आहे. डालिओ यांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना 1930 च्या दशकाशी केली आहे. जो देशांतर्गत आर्थिक अडचणी आणि जागतिक अशांततेचा काळ होता.
रे डालिओ यांनी अमेरिकेतील आर्थिक असमानतेवरही लक्ष केंद्रित केले, असे म्हटले की वरच्या 10% अमेरिकन लोकांकडे अमेरिकेच्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त संपत्ती आहे, तर खालच्या अर्ध्या लोकांकडे 4% पेक्षा कमी संपत्ती आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा देशात संपत्ती आणि मूल्यांमध्ये मोठी तफावत असते तेव्हा संघर्ष देखील वाढतो. त्यांनी या सर्व मुद्द्यांवर सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आणि म्हटले की जर आपण या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला आणखी मोठ्या धोक्याचा सामना करावा लागेल, असे ते म्हणाले. रे डालिओ यांनी यापूर्वी अमेरिकेशी संबंधित अनेक इशारे दिले आहेत. गेल्या वर्षी, मे २०२४ मध्ये, त्यांनी वाढत्या राजकीय ध्रुवीकरणाला अर्थव्यवस्थेच्या समस्या सोडवण्यात एक मोठा अडथळा म्हटले होते. गेल्या महिन्यातच, त्यांनी संभाव्य मंदीबद्दल इशारा दिला आणि आर्थिक अस्थिरतेसाठी ट्रम्प-युगातील टॅरिफला जबाबदार धरले आहे.