जैसलमेरमध्ये लष्कराची जीप उलटली, मेजरचा मृत्यू; लेफ्टनंट कर्नलसह चार जण जखमी

लष्कराची जिप्सी उलटल्याने एका मेजरचा मृत्यू झाला असून लेफ्टनंट कर्नल आणि दोन मेजरसह चार जण जखमी झाल्याची घटना राजस्थानमधील जैसलमेरमध्ये घडली. तनोट पोलीस स्टेशन परिसरातील रामगड आणि लोंगेवाला दरम्यान असलेल्या गमनेवाला गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी एकाच जीपमधून चार लष्करी अधिकारी लोंगेवालाकडे जात होते. गमनेवाला गावाजवळ वळण घेत असताना जिप्सी अनियंत्रित झाली आणि उलटली. या अपघातात लेफ्टनंट कर्नल प्रशांत राय (32), मेजर टीसी भारद्वाज (33), मेजर अमित (30), मेजर प्राची शुक्ला आणि चालक नसिरुद्दीन जखमी झाले आहेत.

जखमींना लष्कराच्या वाहनातून रामगड रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान मेजर टीसी भारद्वाज यांचा मृत्यू झाला. इतर जखमींना प्राथमिक उपचार देऊन लष्करी रुग्णालयात रेफर करण्यात आले. मेजर अमित यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. मेजर प्राची शुक्ला यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि चालक नसिरुद्दीन यांचा डावा कान तुटला.

मेजर टीसी भारद्वाज हे आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबियांनाही अपघाताची माहिती देण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच तनोट पोलीस आणि रामगड पोलीस आर्मी हॉस्पिटलमध्ये आले. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह लष्कराकडे सोपवण्यात आला. अपघाताचे कारण पोलीस तपास करत आहेत.