मुद्दा – ‘पीओके’मधील कोंडी कशी फुटणार?

>> प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

पाकव्याप्त कश्मीरमध्ये सध्या सुरू असलेला जनआंदोलनाचा संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे. त्या आंदोलनाची कारणे, इतिहास, परिणाम आणि भवितव्याची शक्यता यांचा आढावा घेण्याची गरज आहे. पाकिस्तानशी निगडित राजकीय अस्थिरता आणि स्थानिक प्रशासनाच्या उपेक्षेने निर्माण झालेल्या या तणावाला अनेक पदर आहेत. ते समजून घेऊन पीओकेमधील सार्वजनिक जीवनातील अडचणी आणि त्या सोडविण्यासाठी आवश्यक राजकीय व आंतरराष्ट्रीय उपाययोजनांची गरज आहे.

बलुचिस्तानमधील बीएलए ही संघटना स्वतंत्र बलुची राज्याच्या स्थापनेसाठी आंदोलन करीत आहे. आता पाकिस्तानी राजकारणात पीओकेचे नवे वादळ उद्भवले आहे. पाकव्याप्त कश्मीरमध्ये अवामी कृती दलाच्या आंदोलनाने उग्ररूप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाकव्याप्त कश्मीरचा प्रदेश असंतोषाने धुमसतो आहे.

गुंतागुंतीची कारणे

पाकव्याप्त कश्मीरमध्ये जनतेला जसे प्रतिनिधित्व दिले पाहिजे तसे दिले जात नाही. त्यांच्याकडून अवाच्या सवा कर वसूल केला जातो, पण त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र डोळेझाक केली जाते. त्यामुळे आपल्याला जर मूलभूत सोयीसुविधा मिळत नसतील तर तेथे राहून उपयोग काय, असे प्रश्न तेथील युवकांच्या मनात निर्माण झाले. विशेषत गेल्या आठवडय़ात इंटरनेट सुविधा बंद केल्यामुळे युवक वर्ग संतापला आणि तो रस्त्यावर उतरला. त्यांनी पाक प्रशासनाविरुद्ध जोरदार निदर्शने केली. त्यामध्ये एका जणाला प्राणास मुकावे लागले, सातपेक्षा अधिक लोक जखमी झाले. हे आंदोलन आजही थांबलेले नाही. अशा वेळी पाकिस्तानमधील शहाबाज शरीफ यांचे सरकार नमते घेण्याऐवजी आंदोलकांवर वरवंटा फिरवीत आहे.

पाकव्याप्त कश्मीरचा प्रदेश निसर्गदृष्टय़ा संपन्न आहे. हिमालयाच्या कुशीतील हे छोटेसे राज्य साडेसहा लाख लोकसंख्येने युक्त आहे. त्यामध्ये पीओकेसह बलुचिस्तान आणि गिलगिट या प्रदेशांचा समावेश होतो. गिलगिट हे हिमालयातील एक सर्वोच्च शिखर असून येथून जगाच्या कुठल्याही भागावर टेहळणी करता येते. त्यामुळे भू-राजनैतिक दृष्टीने याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानशी गोडीगुलाबी करून तेथे लष्करी तळ उभारला आहे. पीओकेमधील सध्याच्या जनआंदोलनाचा प्रभाव कसा व किती टिकाव धरतो यावर पीओकेचे भवितव्य अवलंबून आहे. शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष, वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई यामुळे पीओकेमधील सामान्य माणूस पाक प्रशासनाला वैतागला आहे आणि त्याला आता पाकिस्तानपासून मुक्तता हवी आहे. हाच केंद्रबिंदू घेऊन अवामी लीग अॅशन कमिटीने जनतेचा आवाज बुलंद केला आहे आणि आपल्या समस्यांचे प्राधान्यक्रम मांडले आहेत.

भारताची भूमिका

भारताला असे वाटते की, पीओकेमधील जनताच पाकविरोधी उठाव करेल आणि लोकच पीओके मुक्त करतील व सुशासनासाठी भारतात विलीन होण्याची इच्छा प्रकट करतील. त्यामुळे त्यांच्या विस्कटलेल्या जीवनाची घडी पुन्हा बसू शकेल आणि अडकून पडलेले विकासाचे प्रवाहसुद्धा खुले होऊ शकतील. अर्थात समृद्ध भूमी पाकिस्तान कधीच भारताला देणार नाही.

पीओकेमधील जनतेचे हाल कमी करण्यासाठी आता तेथील तरुणांनी पाकिस्तानविरुद्ध एल्गार पुकारला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाकवर दबाव निर्माण करण्याचे त्या आंदोलकांचे प्रयत्न आहेत. अशा वेळी अवामी कृती संघटनेने ठाम भूमिका घेतली पाहिजे.

वेळोवेळी आंदोलन झाले की, पाकिस्तान थोडीफार सुधारणांची मलमपट्टी करते, मधाचे बोट दाखवते, वेळ मारून नेली जाते, पण प्रश्न मात्र आहे तसाच राहतो. त्यामुळे आता आंदोलकांनी माघार न घेता पाकविरोधात आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण केला पाहिजे. तसे झाले तरच पीओकेचा प्रश्न सुटेल नाहीतर ‘येरे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होईल आणि आंदोलनाचा बदला घेण्यासाठी म्हणून पाक सरकार पीओकेमधील जनतेशी सोडबुद्धीने वागू शकेल.