जुन्या रागातून अल्पवयीन मुलीचा जात्यावर आपटून खून, आरोपीची कबुली; 18पर्यंत पोलीस कोठडी

सातारा तालुक्यातील सासपडे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणी संशयित राहुल यादव याला सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने हत्येचा कबुलीनामा देत धक्कादायक माहिती देण्यास सुरुवात केली आहे. संशयिताला पॉर्न (अश्लिल) व्हिडीओ बघण्याचा नाद होता. तसेच, जुन्या रागातून हे कृत्य केल्याचे तो सांगत आहे. तो देत असलेल्या माहितीची पोलीस खातरजमा करत तपासाचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, संशयित राहुल यादव याला सातारा जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने (दि. 18) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राहुल बबन यादव (वय 35, रा. सासपडे) याने शुक्रवारी (दि. 10) दुपारी शाळकरी मुलीचा निघृण खून केला. संशयिताच्या अटकेनंतर शेकडोंचा जमाव संतप्त बनला. संशयित राहुल यादव याच्या घरावर हल्लाबोल करत तोडफोडकेली. राहुलवर आरोपांची जंत्रीच जमावाने सांगण्यास सुरुवात केली.

संशयित राहुल यादव याने पोलिसांकडे कबुली जबाब देताना शाळकरी मुलीचा खून केल्याचे मान्य केले आहे. खुनावेळी ती घरी एकटीच असल्याची खात्री झाली. यामुळे तिला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने जोरदार प्रतिकार केला. मात्र, त्याच्या ताकदीपुढे ती निष्प्रभठरली. तिला उचलून जात्यावर आपटत वरंवटा डोक्यात घातल्याची माहिती राहुलने पोलिसांना दिली. पोलिसांचे एक पथक राहुल यादवची झाडाझडती घेत आहे. दुसरे पोलिसांचे पथक त्याचा मोबाईल स्कॅन करत तांत्रिक माहिती घेत आहेत. राहुल यादवच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला अश्लिल व्हिडीओ बघण्याचा नाद आहे. पोलिसांनी मोबाईल हिस्ट्री तपासली असता, तसे स्पष्ट झाले आहे.

पोक्सोत निर्दोष; पण राग कायम

संशयित राहुल यादववर 2012 मध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. काही दिवस जेलमध्ये मुक्काम झाला. मात्र, पुढे केस चालल्यानंतर त्यात तो निर्दोष सुटला, अशी पहिल्या गुन्ह्याची माहिती आहे. याच पोक्सो प्रकरणात शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांनी संबंधित पीडित कुटुंबीयांना आधार देऊन शक्य ती मदत केली होती. यामुळे राहुल हा मृत मुलीच्या कुटुंबीयांवर राग धरून होता, अशी तपासात माहिती येत आहे.