
ख्रिश्चन धर्मांतर घडवून आणणे तसेच धार्मिक भावना दुखावणे आदी आरोप असलेल्या अमेरिकेतील नागरिकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अटके प्रकरणी उत्तर सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज पोलिसांना दिले. दरम्यान आरोपी सत्र न्यायालयात जामीन अर्जाचा पाठपुरावा करू शकतो, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
व्यावसायिक व्हिसावर हिंदुस्थानात आलेल्या जेम्स लिओनार्ड वॉटसन याने अन्य सहकाऱयांच्या मदतीने भिवंडी, चिंबीपाडा गावातील ग्रामस्थांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. धर्मातर तसेच धार्मिक भावना दुखावण्याच्या आरोप प्रकरणी जेम्स वॉटसनला 3 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली. आरोपी जेम्सला 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा करत जेम्सची पत्नी ट्रेसी गॅरेट हिने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. झमान अली यांच्यामार्फत हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर आज मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी उत्तर देण्याचे आदेश दिले व सुनावणी 11 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.