माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकाला मोदी सरकारची परवानगी नाही!

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रपर पुस्तकाला मोदी सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही. एक वर्षाहून अधिक काळापासून हे पुस्तक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

हिमाचल प्रदेशातील कसौली येथे सुरू असलेल्या खुशवंत सिंह साहित्य महोत्सवाच्या वेळी नरवणे यांनीच ही माहिती दिली. डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत लष्करप्रमुखपदी असलेल्या नरवणे यांनी आपल्या आठवणी व अनुभवांवर ‘पह्र स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पूर्ण होऊन प्रकाशकांकडे पाठवण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकारच्या आक्षेपांमुळे त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व ऑर्डरही रद्द करण्यात आल्या आहेत.

अग्निवीर योजनेचे सत्य

मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ भरती योजनेबाबत नरवणे यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. लष्कराचा सल्ला डावलून सुरू केलेली ही राजकीय योजना होती. ‘अग्निवीर’ म्हणून भरती केल्या जाणाऱया जवानांपैकी 75 टक्के तरुणांना सेवेत कायम करण्याचा लष्कराचा प्रस्ताव होता. मात्र सरकारने केवळ 25 टक्के ‘अग्निवीरां’ना अवघ्या 20 हजार पगारावर कायम करण्याचा निर्णय घेतला. लष्कराने पाठपुरावा केल्यानंतर हा पगार 30 हजार करण्यात आला. सरकारच्या या योजनेला मोठा राजकीय विरोध झाला होता. त्यानंतर ही योजना लष्कराचीच असल्याचे चित्र सरकारने उभे केले होते. तेही नरवणे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून खोडून काढले आहे.

माझं काम झालंय!

‘माझं काम पुस्तक लिहिणं आणि ते प्रकाशकांना देणं एवढंच होतं. ते मी केलंय. आता परवानगी मिळवण्याचं काम प्रकाशकांचं आहे. प्रकाशकांनी पुस्तक संरक्षण मंत्रालयाकडं पाठवलं आहे. वर्षभराहून अधिक काळापासून संरक्षण मंत्रालय पुस्तकाचा आढावा घेत आहे. मी लिहिण्याचा आनंद घेतला. ते चांगले आहे की वाईट माहीत नाही. संरक्षण मंत्रालयाला योग्य वाटेल तेव्हा ते परवानगी देतील,’ असे नरवणे यांनी सांगितले.

नरवणे यांच्या पुस्तकात काय?

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, या पुस्तकात लष्कराच्या संवेदनशील कारवाया आणि सरकारी धोरणांबद्दलची चर्चा आहे. 2020 मध्ये हिंदुस्थान व चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या वेळी सरकार व लष्करी अधिकाऱयांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेचा तपशील आहे. चिनी सैन्याच्या कारवायांच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी रात्री उशिरा झालेल्या संभाषणाचाही यात समावेश आहे.