
नाटकाचा प्रयोग संपल्यावर प्रेक्षक कलाकारांच्या सह्या घेण्यासाठी जातात. प्रेक्षक कलाकारांची सही घेण्यासाठी जाताना अनोख्या शकला लढवतात. कुणी टी शर्टवर सही घेतात तर कुणी डायरीमध्ये.. पण गडकरी रंगायतनमध्ये एका प्रेक्षकाने चक्क भिंतीवर लावण्यात येणाऱ्या टाईलवर सही घेतली.
नुकताच गडकरी रंगायतनमध्ये कुटूंब किर्रतन या नाटकाचा प्रयोग पार पडला. वंदना गुप्ते यांची सही घेण्यासाठी एक प्रेक्षक त्यांच्या मेकअप रुममध्ये गेले. परंतु ही सही त्यांनी एक टाईलवर घेतली. वंदना गुप्ते यांनी हा किस्सा नुकताच फेसबुकवर शेअर केला. त्यांनी त्या प्रेक्षकाला ही सही घेण्याचे कारण विचारले. त्यावेळी ते म्हणाले, गडकरी रंगायतन हे ठाण्याचे वैभव आहे. या रंगमंदिराच्या नूतनकरणावेळी तिथल्या काही टाईल्स त्यांनी घरी नेल्या. त्याच टाईल्सवर त्यांनी वंदना गुप्ते यांची सही घेतली.
गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणावेळी या प्रेक्षकाने तिथल्या तीन ते चार गोणी लाद्या घरी नेल्या. या सर्व टाइल्सवर ते कलाकारांची सही घेऊन या टाईल्स त्यांच्या घरात लावणार आहे. फॅनचा हा किस्सा वंदनाताईंनी अगदी आवर्जून सोशल मीडियावर शेअर केला.