कल्याणमध्ये कुत्र्यांचा नसबंदी घोटाळा; रोज पकडतात पाच कुत्री; शस्त्रक्रिया दाखवतात 35 कुत्र्यांची

डोंबिवलीतील भटक्या कुत्र्यांचा नसबंदी घोटाळा माहिती अधिकारात उघड झाला आहे. केडीएमसीकडे एकच डॉग स्क्वाड वाहन असून दररोज 5 ते 10 कुत्री पकडली जातात. मात्र, श्वान निर्बिजीकरण केंद्रात 40 ते 50 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. त्यामुळे पालिका केंद्रातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असून श्वान निर्बिजीकरण केंद्रातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला केडीएमसीचे श्वान निर्बिजीकरण केंद्र आहे. या केंद्रात दररोज ४० ते ५० कुत्र्यांची नसबंदी दाखवली जाते. धक्कादायक बाब म्हणजे या केंद्रात एकच डॉक्टर आहे. एकच डॉक्टर रोज ४० ते ५० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया कशी काय करू शकतो, असा सवाल मनोज कुलकर्णी यांनी केला आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे डॉग स्क्वाड दररोज ५ ते १० कुत्री पकडतात. मग उर्वरित ३० कुत्र्यांची नसबंदी कागदावर दाखवून मलिदा लाटला जातो, असा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. या घोटाळ्यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची साखळी असून केंद्रप्रमुख कमलेश सोनावणे यांचे तत्काळ निलंबन करून चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

ऑगस्ट २०२४ मधील हजेरी पत्रकात डॉ. राजेश सहानी यांचे नाव आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून ते कामावर नाहीत. तरीही त्यांच्या नावावर वेतन काढले जात आहे. तसेच डॉ. महेश आहेर एम. के. संस्थेमार्फत काम करतात. परंतु त्यांना जीवरक्षा संस्थेच्या मस्टरवर दाखवून पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचे पुरावेच कुलकर्णी यांनी आयुक्तांना दिले आहेत. या सर्व गैरव्यवहारात केंद्रप्रमुख कमलेश सोनावणे यांचा सहभाग असल्याने त्यांचे तत्काळ निलंबन करून चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. यासंदर्भात पालिका उपायुक्त वंदना गुळवे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

कुत्री पकडण्याचे, नसबंदी व सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकारात दिलेले नाही.
२०२४ सालापासूनचे रेकॉर्ड मागितले असताना केवळ १५ दिवसांचेच फुटेज देण्यात आले आहे.
श्वान नसबंदीच्या नावाखाली महिन्याला १० ते १२ लाखांची बिले काढली जात असली तरी प्रत्यक्ष ऑपरेशनचे पुरावे नाहीत.
तीन डॉक्टरांची नियुक्ती दाखवली असली तरी हजेरी पत्रकात फक्त एका डॉक्टरची उपस्थिती दाखवण्यात आली आहे.
नसबंदी केंद्रातील डॉक्टर खासगी संस्था तसेच पालिकेकडून दुहेरी वेतन घेत असल्याचे उघड.
सेवेत नसलेल्या डॉक्टरच्या नावे वेतन काढले