सरन्यायाधीशांवर बूटफेकीचा प्रयत्न, चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भरन्यायालयात जोडा फेकण्याचा संतापजनक प्रयत्न गेल्या 6 ऑक्टोबर रोजी घडल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रीय चर्मकार समाजाने वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकारामागे असलेले षड्यंत्र केंद्र सरकारने उघड करावे आणि यातील आरोपी वकील राकेश तिवारी याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ आदी घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच तेथे बॅरिकेड्स लावून हा मोर्चा खेरवाडी पोलिसांनी अडविला. बूटफेकीच्या हल्ल्याअगोदर राकेश तिवारीला कोण कोण भेटले, त्याला हल्ल्यापूर्वी कोणी कोणी फोन केले याची चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी बाबुराव माने यांनी मोर्चाप्रसंगी केली. बुद्धिमत्तेच्या जोरावर भूषण गवई सरन्यायाधीश झाले. याचा रास्त अभिमान चर्मकार समाजाला आहे. त्यांच्याबाबत अशा प्रकारे अवमानजनक कृत्य केले असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबईचे माजी अध्यक्ष जगन्नाथ खाडे, विद्यमान अध्यक्ष विलास गोरेगावकर, मुंबई महिला अध्यक्षा शारदा नवले, उपनगर अध्यक्ष अशोक देहेरे, दिलीप शिंदे, गणेश खिलारी, अमर शिंदे, राजीव सूर्यवंशी, धामापूरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.