हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी दिलं आश्वासन; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानबाबत आणखी एक मोठा दावा केला आहे. हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिल्याचे ट्रम्प म्हणाले. ते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. ट्रम्प यांच्या दाव्यावर हिंदुस्थानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चिंता व्यक्त केल्याचे ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. हिंदुस्थानकडून मिळणारा पैसा रशिया युक्रेनसोबत युद्धात वापर होता. त्यामुळे हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करणे आनंददायी नव्हते, असेही ट्रम्प म्हणाले.

यावेळी त्यांनी असाही दावा केला की, मोदींनी आपल्याला आश्वासन दिलेय की रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. हे एक मोठे पाऊल असून आपल्याला चीनलाही असे करण्यास सांगावे लागेल, असेही ते म्हणाले.

ऊर्जा धोरणांवर मतभेद असतानाही पंतप्रधान मोदी माझे जवळचे मित्र आहेत, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. चीनसोबतच्या तणावाच्या काळात हिंदुस्थानला एक विश्वासार्ह भागीदार मानतात का? असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, ते माझे मित्र असून आमचे खूप चांगले संबंध आहेत.

हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुल्लेख

व्यापाराची भीती दाखवून आपण अनेक युद्ध थांबवली. जसे की, हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध. सात लढाऊ विमाने पडली होती, वाईट गोष्टी घडत होत्या आणि त्याचवेळी मी त्यांच्याशी व्यापाराबाबत चर्चा केली. युद्ध थांबवले नाही, तर व्यापार होणार नाही. तसेच तुमच्यावर 200 टक्के टॅरिफ लादू असेही दोन्ही देशांच्या प्रमुखांना ठणकावले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी युद्ध थांबले, असा दावाही ट्रम्प यांनी केला.