श्रीवर्धन, नागाव, पालघरचा समुद्रकिनारा सर्वात स्वच्छ; आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन

राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ब्लू फ्लॅग मानांकन पायलट’ प्रमाणपत्र मिळवले आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. यासह पालघरमधील पर्णका बीच तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांनाही ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झाले आहे. जागतिक पातळीवर स्वच्छ, सुंदर समुद्र आणि पर्यावरणपूरक किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन दिले जाते.

डेन्मार्क येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थेमार्फत हे मानांकन दिले जाते. ३३ निकषांचे मूल्यमापन करून ब्लू फ्लॅग दर्जा दिला जात असतो. पर्यावरण शिक्षण, जल गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन तसेच सेवा सुरक्षा, सेवा या घटकांचा यात समावेश असतो. या घटकांच्या पडताळणीनंतर समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र दिले जात असते. कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी या मानांकनासाठी अर्ज केले होते. ज्याची पडताळणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाली होती. या पडताळणीनंतर राज्यातील पाच किनाऱ्यांना हे मानांकन देण्यात आले आहे.

निकष पूर्ण करावे लागणार

यापूर्वी देशातील १३ समुद्रकिनाऱ्यांना हे मानांकन देण्यात आले होते. मात्र त्यात राज्यातील एकाही समुद्रकिनाऱ्याचा समावेश नव्हता. ज्या किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाला आहे त्यांना निश्चित केलेले निकष वर्षभरात पूर्ण करावे लागणार आहेत.