
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुती सरकारला सोडणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. छत्रपती संभाजीनगर येथील अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहल शेख यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते.
दिवाळीच्या आजच्या पहिल्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देताना आपल्याला मराठवाडा आणि महाराष्ट्रातला आपत्तीग्रस्त शेतकरी दिसतोय. त्या शेतकऱ्यांच्या मागे इतर कुणी असो वा नसो, पण शिवसेना त्यांना न्याय देण्यासाठी प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत राहील, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा दिला. आठ दिवसांपूर्वी आपण मराठवाड्यात गेलो होतो तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा शब्द दिला होता. कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचेच नाही. कारण महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. सरकारची अशी ही फसवाफसवी सुरू आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
खरडून गेलेल्या जमिनीला सरकारने तीन-साडेतीन लाख रुपये जाहीर केले. मदत हवी तर दिवाळीनंतर करा, पण यातील एक लाख दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका अशी मागणी शिवसेनेने केली होती, पण सरकारने तसे केले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन नाही तर कर्ज पूर्ण माफ करा ही शिवसेनेची मागणी आहे, याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. यावेळी शिवसेना नेते-आमदार अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, छत्रपती संभाजीनगर महानगरप्रमुख राजू वैद्य आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
दिवाळीनंतर पुन्हा मराठवाडा दौरा
दिवाळीनंतर पुन्हा मराठवाड्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना सांगितले. मराठवाड्यात येणार असलो तरी तालुका पातळीवर शिवसेनेची पथके पाहिजेत आणि त्यांनी सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे, ते शेतकऱ्याला मिळते की नाही हे पाहिले पाहिजे, शेतकऱ्याला ते मिळवून देण्याचे काम शिवसैनिकांनी करायचे आहे, नाहीतर केवळ घोषणा देऊन उपयोग नाही, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी उपस्थितांनी घोषणा देताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शेतकऱ्यांचा अन्नदाता असा केला. मात्र शेतकऱ्यांचा अन्नदाता मी नाही तर शेतकरी खरा अन्नदाता आहे, पण मी शेतकऱ्यांचा सोबती असून शेतकऱ्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.