
मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) तीन एकर जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकल्यामुळे जैन समाज संतप्त झाला आहे. पुणे शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेली शेकडो कोटी रुपयांची ही जमीन भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संगनमताने ‘गोखले कन्स्ट्रक्शन’ या बड्या बिल्डरला विकल्याचा आरोप करण्यात आला. हा बेकायदेशीर व्यवहार तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी आज जैन समाजाने जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा प्रचंड मोर्चा काढून निषेध नोंदविला आहे.
या मोर्चात आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज, तीर्थेश ऋषीजी, माताजी महाराज हे मुनीगण होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते अभय छाजेड, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
असा झाला जमीनविक्री व्यवहार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाने पब्लिक ट्रस्टची 3000 कोटींची मालमत्ता 230 कोटींना हडपण्याचा डाव आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी ही पब्लिक ट्रस्टची 3 एकर जागा गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला 230 कोटींना विकली आहे. हे सर्व व्यवहार 30 सप्टेंबर 2025 रोजी साठेखत करून गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीने 1 ऑक्टोबर 2025 रोजी कर्नाटकातील बिरेश्वर पतसंस्थेकडून 50 कोटी व बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडून 20 कोटी कर्ज मंजूर करून घेतल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.