
भाजप हा घोटाळेबाज आणि वोट चोरांचा पक्ष आहे. पैशाने निवडणुका जिंकायच्या हे सत्ताधाऱ्यांचे सूत्र बनले असून मतांची चोरी करूनच ते निवडून आले असल्याचा आरोप शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज केला. मतदान याद्यांमधील घोळ तसेच वोट चोरीचे पितळ आता पुराव्यानिशी उघड झाल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या घोटाळेबाज भाजपला सर्वसामान्य जनताच आगामी निवडणुकीत धडा शिकवेल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
पालघर येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आज झाले. या वेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पैशाने निवडणुका जिंकून सत्ता मिळाली असली तरी अशी सत्ता फार काळ टिकणार नाही. विविध प्रकल्पांवरही जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, बुलेट ट्रेन ही केवळ मुंबई लुटण्यासाठी असून अहमदाबाद, सुरतचे हिरे व्यापारी इथे येणार आणि मुंबईला लुटून परत जाणार. सर्वसामान्यांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही. माकणे येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले.
या वेळी माजी आमदार व पालघर संपर्कप्रमुख विलास पोतनीस, उपनेते व पालघर लोकसभा यंत्रणाप्रमुख अमोल कीर्तीकर, उपनेते उत्तम पिंपळे, पालघर जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, अनुप पाटील, सहसंपर्कप्रमुख विकास मोरे, पालघर लोकसभा निरीक्षक अजय ठाकूर, महिला संपर्क संघटक ममता चेंबूरकर, माजी संपर्कप्रमुख नीलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख सुधीर तामोरे, राजेश कुटे, दिलीप देसाई, संजय कांबळे, तालुका प्रमुख अनिल तरे, शहरप्रमुख भूषण संखे, डॉ. विश्वास वळवी, माजी नगरसेवक जितेंद्र पामाळे, जयेंद्र दुबळा, मनोज संखे, सुनील महेंद्रकर, भावना किणी, नमिता राऊत, अनुजा तरे, राधा पामाळे, गीता संखे, अनुराधा सोनी, युवासेनेचे रॉकी तांडेल आदी उपस्थित होते.
शिंदे गट म्हणजे ठेकेदारांची सेना
शिंदे गट म्हणजे भाजपच्या धाकाने निघालेली वाऱ्यावरची वरात असून ती ठेकेदारांची सेना आहे. मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून निवडून यायचे हेच फक्त त्यांचे काम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बोरिवली ते पालघर लोकलने प्रवास
मुंबई-अहमदाबाद मार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज बोरिवली ते पालघर असा लोकलने प्रवास केला.