महायुतीमध्ये बिनसले; शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार, ठाण्यात भाजपच्या स्वबळापाठोपाठ अजित पवार गटाचेही एकला चलो…

ठाणे पालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीच ठाण्यात भाजपने स्वबळाचा नारा दिला असताना आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही एकला चलोची भूमिका घेतली आहे. शिंदे गट व भाजपच्या विरोधात आम्ही ठाण्याची निवडणूक लढवणार असून त्याची तयारीदेखील सुरू केली असल्याचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी जाहीर केले आहे. ठाण्याचा महापौर हा आमच्या मर्जीचाच होईल, असेही त्यांनी सांगितल्याने ठाण्यात महायुतीमध्ये बिनसले असून शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार आहे.

राज्यातील सत्तेत भाजप, शिंदे गट व अजित पवार यांचा गट असे तीन पक्ष असले तरी या ट्रिपल इंजिनला ठाण्यात ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी जाहीरपणे ७० पारच्या घोषणा दिल्या. आमदार संजय केळकर यांनी तर ठाण्याचा पुढील महापौर आमचाच होईल, असा नारासुद्धा दिला. शिंदे गटानेदेखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली. त्यानंतर महायुतीमधील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या अजित पवार गटानेही स्वबळावर लढणार असल्याचे सांगितल्याने महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे दिसून आले आहे.

भ्रष्टाचाराचा बोजा नको

नजीब मुल्ला यांनी सांगितले की, पालिका सभागृहात आम्ही भ्रष्टाचाराविरोधात अनेकदा आवाज उठवला. पण गेल्या वीस वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराचा बोजा घेऊन आम्हाला पालिका निवडणुकींना सामोरे जायचे नाही. भाजप व शिंदे गटाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असून त्यासाठी वरिष्ठांकडे परवानगी मागितली असल्याचेही मुल्ला यांनी स्पष्ट केले. मात्र पक्षाचा जो आदेश येईल तो आम्हाला मान्य राहील असे त्यांनी नमुद केले.

अपक्ष लढण्यासाठी दबाव

ठाणे महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्यासाठी आमच्यावर दबाव येत असल्याची कबुली नजीब मुल्ला यांनी प्रसारमध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, आम्ही संपलो तरी चालेल पण पक्षाच्या चिन्हावरच लढणार असून कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. एकत्र लढलो तर शहरी भागात आम्हाला जागाच मिळणार नाहीत. स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाऊन किमान २० जागा निवडून आणणार असल्याचे मल्ला यांनी सागितले.